धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 21:30 IST2020-03-31T21:04:19+5:302020-03-31T21:30:17+5:30
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते.

धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली
नवी दिल्ली - निजामुद्दीन तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर आता देशातील ज्या-ज्या राज्यांतून या जमातसाठी लोक आले होते, त्या सर्व राज्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लोक मार्च मिहिण्यात जमातसाठी आले होते. या मरकजसाठी आलेल्या 2100 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, एकट्या तेलंगणातून या जमातमध्ये तब्बल 1000 लोकांनी सहभाग घेतल्याचा अंदाज तेलंगणा सरकारने व्यक्त केला आहे.
निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत होते 1746 लोक -
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते. एवढेच नाही, तर यावर्षी तब्बल 2100 परदेशी लोक तबलिगी जमातच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. यात इंडोनेशिया, मलेशिया, थाइलंड, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि किर्गिस्तानमधील लोकांचा समावेश आहे.
तबलिगी कार्यांत भाग घेण्यासाठी भारतात येणारे परदेशी लोक साधारणपणे सर्वप्रथम दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजाला रिपोर्ट करतात. यानंतरच ते इतर मरकजमध्ये जातात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
निजामुद्दीनमधील 2,137 जणांची ओळख पटली -
गृह मंत्रालयाने म्हटले आहे, की 28 मार्चलाच केंद्राने सर्व राज्यांतील पोलिसांना, तबलिगी जमातमध्ये भाग घेणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा, आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. तसेच आवश्यकता असेल तर त्यांना क्वारंटइन करण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. देशभरात मंगळवारी 2,137 लोकांची ओळख पटली आहे. या लोकांची वैद्यकीय चाचणी करणे सुरू आहे. तसेच त्यांना क्वारंटानमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच असे आणखीही लोक शोधले जात आहेत.
एकट्या तेलंगणातून 1000 लोक सहभागी झाल्याचा अंदाज -
निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या बैठकीत सहभागी झालेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेलंगणा सरकार चिंतीत आहे. यामुळे तेलंगणा सरकार निजामुद्दीन येथील मरकजमध्ये भाग घेतलेल्या लोकांचा कसून शोध घेत आहे. एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत, 'या मरकजमध्ये तेलंगणातील 1000 लोक दिल्लीला गेल्याचा अंदाज असल्याचे म्हटले आहे. संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचाही शोध घेत आहे.
याशिवाय हिमाचल पर्देशातून 17, तर पदुच्चेरीतील 6 जणांनी या मरकजमध्ये भाग घेतला होता, अशी माहिती तेथील सरकारांनी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील तब्बल 19 जिल्ह्यांतील लोक या जमातमध्ये सहभागी झाले होते असे समजते.