नवऱ्यानेच मुलीचा घातपात केल्याचा महिलेचा संशय; पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काय आढळलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:53 IST2025-03-14T16:53:16+5:302025-03-14T16:53:44+5:30
मुलीच्या मृत्यूला तिचे वडील व कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

नवऱ्यानेच मुलीचा घातपात केल्याचा महिलेचा संशय; पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काय आढळलं?
Nashik Crime : मखमलाबाद शिवारातील एका शेतात खेळताना विहिरीत पडलेल्या दीड वर्षाच्या वैष्णवी विकास वळवी या चिमुकलीचा मृत्यू बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून गुरुवारी समोर आल्याचं म्हसरूळ पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीच्या मृत्यूला तिचे वडील व कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला असून, याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
मखमलाबाद परिसरातील स्मशानभूमीलगतच्या जागेत बालिकेचा दफनविधी तिच्या वडिलांनी पोलिसांना न कळवता सोमवारी केला होता. विकास वळवी हे मागील काही महिन्यांपासून पत्नीपासून विभक्त राहत आहेत. त्यांच्यात वाद होत असल्याने त्यांनी वैष्णवीला स्वत:जवळ ठेवून घेत पत्नीला घरातून काढून दिले होते. मुलीचा घातपात झाल्याची तक्रार विवाहितेने केल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून मृतदेह उकरून काढत जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी बुधवारी पाठवला होता. दरम्यान, या प्रकाराबद्दल मयत वैष्णवी हिची आई विद्या वळवी शुक्रवारी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी येणार आहे.
विहिरीभोवती कठडे नाही!
मखमलाबाद शिवारातील तवली फाटा भागातील पिंगळे नामक व्यक्तीची शेती आहे. या शेतीमध्ये बालिकेचे वडील मोलमजुरी काम करतात. या शेतामधील विहिरीत बालिका कोसळली त्या विहिरीभोवती संरक्षक कठडेदेखील नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे पोलिसांच्या तपासात पुढे काय बाबींचा उलगडा होतो? याकडे लक्ष लागले आहे.