सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 06:33 PM2019-09-20T18:33:36+5:302019-09-20T18:41:43+5:30

मनसे सोडल्यानंतर राज यांना मुंबई, पुण्याप्रमाणेच नाशिकने साथ दिली.

Will Raj Thackeray's miracal review in the Nashik? | सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?

सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?

Next

- संजय पाठक

नाशिक : तो एक काळ होता. शहरी भागातील सर्व मतदार अक्षरश: भारावले होते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष ज्येष्ठांच्या बरोबरच किशोरवयीन आणि शाळकरी मुलांचा सुद्धा पॅशन बनला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी साद घालावी आणि त्याला प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून तर मिळायचाच परंतु त्याला जनभावनेची साथदेखील असायची. परंतु २०१४ नंतर सारे राजकारण बदलले. पारंपरिक राजकारणाचे आयाम बदले. मनसेची ताकद क्षीण होत गेली आणि पुन्हा राज यांची राजकीय भूमिकादेखील बदलत गेली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारे राज हे त्यांच्याच वळचणीला बसले, अशी टीका होऊ लागली. मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नाही परंतु लोकसभेच्या प्रचारात मोदी आणि शहा यांच्या विरोधातील मैदान मात्र राज यांनी गाजवले, परंतु नंतर त्याचा उपयोग न झाल्याने स्वत:च राज निराश झाल्याचे सांगितले जात असून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरायचे की नाही, याबाबत ते निर्णय घेण्यास तयार नाही. आता कुठे ते लढण्याच्या मानसिकतेत आल्याचे सूत्रांनी सांगितले असले तरी गेल्या २००९ ते २०१९ या कालावधीत मोठा बदल झाला आहे. राज पुन्हा त्याच मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात शंभर जागा लढवायच्या तयारीत आहेत. परंतु आता पुन्हा ते करिष्मा दाखवू शकतील काय हाच खरा प्रश्न आहे.

मनसे सोडल्यानंतर राज यांना मुंबई, पुण्याप्रमाणेच नाशिकने साथ दिली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पारंपरिक जातीय धार्मिक राजकारणावर प्रहार करताना त्यांनी वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या का सुटत नाही, असा प्रश्न करीत प्रस्थापित राजकारणांच्या मर्मावर बोट ठेवले तेव्हा त्यांच्याविषयी एक विश्वास निर्माण झाला होता. शिवसेनेने सोडलेला मराठीचा मुद्दा त्यांनी हाती घेतला आणि त्याच सुवर्ण त्रिकोणात त्यांना मोठा प्रतिसाद लाभला. केवळ राजकीय मुद्दाच नव्हे तर त्यांनी मुलांचे करिअर घडवणारे आणि रोजगार मिळवून देणाऱ्या प्रशिक्षणाचे अन्य कल्पक उपक्रम राबविले. त्यामुळे हा पक्ष शहरातील घराघरांत पोहोचला.

२००९ मध्ये पहिलीच विधानसभा निवडणूक लढविताना राज यांचे राज्यात १३ आमदार निवडून आले. हा कल इतका धक्कादायक होता की, नाशिकमध्ये तर राज ठाकरे यांच्यावरच ईव्हीएम हॅकिंगचे आरोप झाले आणि न्यायालयातदेखील हे प्रकरण गेले होते. मनसेच्या १३ आमदारांपैकी तीन जण तर केवळ नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांतून निवडून आले होते. त्या पाठोपाठ नाशिकमध्येच याच पक्षाचा पहिला महापौरदेखील निवडून आला.

नाशिकमध्ये राज यांना नाशिक महापालिकेत सत्ता मिळाली, परंतु त्याचा राजकारण म्हणून फार उपयोग करून घेता आला नाही. त्यामुळे मनसेचा जोर पाच वर्षांतच ओसरला. त्यामुळे काम करूनदेखील लोक मत देत नाही असा समज करून राज ठाकरे यांनी हेच विधान अनेक ठिकाणी केले. वस्तुत: याच कालावधीत राज यांच्या भूमिकेत बदल झाला होता. २००९ मध्ये गोल्फ क्लब मैदानावर राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन नाशिकचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी यथेच्छ टीका केली होती. त्यांचे ४० नगरसेवक निवडून आले तरी ५३ नगरसेवकांचा जादूई आकडा गाठण्यासाठी त्यांनी भाजपाशी युती केली. अर्थात, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानेदेखील मनसेला नाशिक महापालिकेत सत्तासोपान चढणे सुकर झाले.

महापालिकेतील सत्तेत पहिली अडीच वर्षांची टर्म संपतानाच त्यांनी भाजपाबरोबर काडीमोड घेतला आणि नंतर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मनसेकडे महापौरपद कायम ठेवले. हीच बदलती राजकीय भूमिका त्यांची नंतरच्या काळात दिसून आली असा एक आक्षेप आहे. सत्ता येते आणि जाते परंतु संघटन मात्र ठेवावे लागते. राज ठाकरे यांनी ज्यांना मोठे केले असे नाशिक-मुंबईतील अनेक नेते आमदार सोयीने दुस-या पक्षाच्या वळचणीला गेले आहेत. राम कदम, वसंत गिते , प्रवीण दरेकर, हर्षवर्धन जाधव अशा अनेकांची नावे यात घेता येतील. २०१४ मध्ये मोदी लाटेचा सर्वच पक्षांना आणि मनसेलाही धक्का बसला. परंतु त्यानंतर त्यातून सावरून संघटन टिकवण्यासाठी फार प्रयत्न झाल्याचे निदान नाशिकसारख्या ठिकाणी तरी दिसले नाही. परिणामी नाशिकमध्येदेखील संघटन खिळखिळे झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे. नुकतेच नाशिकमध्ये आलेल्या मनसे नेते अभिजित पानसे आणि संदीप देशपांडे यांच्याकडे यासंदर्भात कैफियतदेखील मांडली आहे.

२०१४ मधील भाजपाच्या विजयापेक्षा अनेक विरोधी पक्षांना २०१९ मधील भाजपचा विजय अधिक धक्कादायक ठरला आहे. राज यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका जनतेच्या पचनी पडली नसल्याचे एकंदरच त्यावेळच्या निकालावरून जाणवत आहे. भाजपचे वाढलेले बळ, केंद्र आणि राज्यातील सत्ता या पक्षात झालेली आवक यामुळे प्रस्थापित पक्षच जेरीस आले आहेत. अशावेळी मनसे निवडणुका लढवणार की नाही याबाबत शंका असताना मुंबई-पुणे आणि नाशिकमध्ये विधानसभेच्या शंभर जागा लढविणार अशी ताजी माहिती सूत्रांनी दिली असून, राज यांनी इच्छुक उमेदवारांची यादीदेखील मागवली आहे. बदलत्या परिस्थितीत राज यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तरी मोठे आव्हान आहे.

निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाला कधी अनुकूल वातावरण असते कधी प्रतिकूल वातावरण असते. मात्र, निवडणुका म्हणजे पक्षीय संघटन नव्हे. पक्षबांधणी ही निरंतर चालणारी प्रक्रि या असते. त्यात पडद्याच्या मागे राहून पक्षासाठी सतत झटणारे हात, प्रेरणा देणारे नेतृत्व असावे लागते. स्थानिक कार्यकर्त्यांना काही कार्यक्र म देतानाच त्यांच्यामागे ठामपणे उभे राहून त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करणारे विवेकी आणि सीमित राजकीय महत्त्वाकांक्षा असणारे नेतृत्व निर्माण करावे लागते. तरच कार्यकर्ते पक्ष जिवंत ठेवतात. राज यांनी व्यक्तिगतरीत्या कार्यकर्त्यांना मदत केली आणि त्यांचे आयुष्य सावरल्याची अनेक उदाहरणे नाशिकमध्येदेखील आहेत. मात्र पक्ष संघटनेच्या पातळीवर मात्र वातावरण थंड आहे. त्यामुळे निवडणुका लढवायच्या की नाही अशा निर्णयानंतर एकदम निवडणुका लढवायच्या असा निर्णय घेणे आणि तो अंमलात आणणे निश्चितच आव्हानात्मक ठरले आहे.

Web Title: Will Raj Thackeray's miracal review in the Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.