मनसे टवाळखोर हटविणार मग, पोलीस यंत्रणा कमी पडतेय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:28 IST2020-02-16T00:25:02+5:302020-02-16T00:28:29+5:30
नाशिक- शहरातील टवाळखोरांचा उपद्रव कमी होणार नसेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलीसांऐवजी सक्रीय व्हावे लागणार असेल तर मग नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा कमी पडते काय असा प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकुणच या प्रयोगााबाबत पोलीसांनी देखील विचार करण्याची गरज आहे.

मनसे टवाळखोर हटविणार मग, पोलीस यंत्रणा कमी पडतेय का?
संजय पाठक, नाशिक- शहरातील टवाळखोरांचा उपद्रव कमी होणार नसेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलीसांऐवजी सक्रीय व्हावे लागणार असेल तर मग नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा कमी पडते काय असा प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकुणच या प्रयोगााबाबत पोलीसांनी देखील विचार करण्याची गरज आहे.
मुली आणि महिलांवरील अत्याचार कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर समाज जागृत झाला असे वाटले असले तरी प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. हिंगणघाट येथील घटनेनंतर आता पुन्हा महिलांवरील अत्याचार याबाबत चर्चा सुरू झाली. शासकिय यंत्रणा अत्याचार प्रतिबंधासाठी काही करीत नाही अशातला भाग नाही परंतु त्या पुरेही पडत नाही असेही दिसून येते. नाशिकमध्येच विचार केला तर ठिकठिकाणी युवतींवर अत्याचार होऊ नये अथवा आपत्कालात त्यांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथक सज्ज आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तर डिकॉय नामक अभिनव प्रकार राबविला. रात्री बेरात्री महिलांची छेडखानी करू पहाणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी महिला पोलीसांनाच सामान्य महिला म्हणून उभे केले. पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी अलिकडेच नाशिक सिटीजन फोरमच्या कार्यक्रमात आतापर्यंत तेरा हजार टवाळखोरांवर कारवाई केल्याची धक्कादायक माहिती दिली. परंतु इतके करूनही युवतींच्या छेडखानीला प्रतिबंध बसलेला नाही.
गेल्या आठवड्यात मनसेच्या मनोज घोडके आणि काही कार्यकर्त्यांनी सारडा कन्या विद्यालयाच्या बाहेर मुलींची छेड काढणा-या काही टवाळखोरांना पळवून लावले. तत्पूर्वी त्यांना चांगलाच प्रसादही दिला. मनसेची खळ्ळ खट्याक ची आक्रमक भूमिका नेहेमीच सर्वांना आकर्षीत करत आली आहे त्यामुळे आता अशाप्रकारचे आणखी काही शाळांबाहेर अशाप्रकारे मोहिम राबविणार असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यानी जाहिर केले. मनसेने कायदा हातात घेणे कितपत उपयुक्त अशी चर्चा या निमित्ताने झडू शकेल. परंतु शहरात अशी अनेक शाळा महाविद्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांच्या बाहेर टवाळखोरांचा उपद्रव सुरू असेल तर मग पोलीस यंत्रणेने टवाळखोरांना धडे शिकवूनही काहीच पदरात पडले नाही काय असा प्रश्न निर्माण होतो.