उत्पादन घटल्याने द्राक्षांना मिळणार यावर्षी उच्चांकी दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 14:38 IST2022-01-26T14:37:17+5:302022-01-26T14:38:19+5:30

गोदाकाठ भागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड करण्यात आली. त्यात शेकडो हेक्टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यातील ...

Will grapes get higher rates this year due to lower production in nashik | उत्पादन घटल्याने द्राक्षांना मिळणार यावर्षी उच्चांकी दर?

उत्पादन घटल्याने द्राक्षांना मिळणार यावर्षी उच्चांकी दर?

गोदाकाठ भागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड करण्यात आली. त्यात शेकडो हेक्टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यातील बहुतांश बागायतदार हे द्राक्ष निर्यात करण्याच्या उद्देशानेच द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत.

साधारण १२० ते १३० दिवसांमध्ये द्राक्षे पूर्ण परिपक्व होतात. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस चालल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये बाग छाटणीला सुरुवात झाली व साधारणत: आता ८० ते ९० दिवसांच्या रेंजमध्ये द्राक्षफळे आली आहेत. या द्राक्षांच्या घडांमधून पाणी उतरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पुढील १० ते १५ दिवसांमध्ये द्राक्षे निर्यातयोग्य होऊन द्राक्ष निर्यात सुरू होईल.

निफाड तालुक्याच्या पट्ट्यामध्ये प्रतिवर्षी पडणारा पाऊस यावर्षी उशिरा सुरू झाला. तसेच सरासरीपेक्षा तो अधिक झाला. अधिक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षांच्या झाडावर रोगराई आली. तसेच कडाक्याची थंडी व अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच २३ जानेवारीपासून थंडी वाढत गेल्याने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने अधिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घटल्याने द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना असल्याचे कारण पुढे करून अनेक व्यापारी कमी दराने द्राक्षबागांचे बुकिंग करीत आहेत. बागायतदारांनी कमी दरात द्राक्षबागांचे बुकिंग करू नये. तसेच अशा व्यापाऱ्यांपासून द्राक्ष बागायतदारांनी सावध राहण्याची गरज आहे.

- कुलदीप गडाख, द्राक्ष उत्पादक, शेतकरी.

सध्या द्राक्षे मऊ पडण्याची प्रक्रिया सुरू आहे. द्राक्षांची गोडी, आकार वाढून पुढील ५ ते १० दिवसांमध्ये म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परिसरातील द्राक्ष निर्यातयोग्य होतील. द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता अधिक आहे.

- नितीन डोखरे, द्राक्ष उत्पादक, शेतकरी

 

Web Title: Will grapes get higher rates this year due to lower production in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.