Wildlife threatened by blind faith; Fraud smuggling was avoided by Forest Department vigilantes | अंधश्रध्देपोटी वन्यजीव धोक्यात; मांडूळ तस्करी वनविभागाच्या सतर्कतेने टळली

अंधश्रध्देपोटी वन्यजीव धोक्यात; मांडूळ तस्करी वनविभागाच्या सतर्कतेने टळली

ठळक मुद्देअंधश्रध्देपोटी मांडूळ सर्पाची तस्करी या गुन्ह्यात दंड व कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहेन्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली.

नाशिक : अंधश्रध्देपोटी दुतोंड्या मांडूळ जातीच्या सर्पाची केली जाणारी तस्करी नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने रोखली. मांडुळासह दोघा संशयित तस्करांना पथकाने रंगेहाथ म्हसरूळ शिवारातून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कार व साडेतीन फुटांचा मांडूळ जप्त केला आहे. संशयित तस्करांना बुधवारी (दि.१६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, मांडूळ हे वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत अनुसुची-४मधील वन्यजीव आहे. या जीवाची तस्करी करणे कायद्याने गुन्हा ठरतो. या गुन्ह्यात दंड व कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. गोपनीय माहितीच्या अधारे वनपाल मधुकर गोसावी यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना तस्करीबाबत माहिती दिली. त्यानंतर तत्काळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोसावी यांनी वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, गोविंद पंढरे, रोहिणी पाटील, विजयसिंग पाटील यांचे पथक तयार करून साध्या वेशात म्हसरूळ शिवारात सापळा रचला. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संशयित चौघे इसम एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एम.एच.०४ जीडी ५८४६) पेठरोडवरील म्हसरूळ गावाच्या शिवारात आले. त्यांनी मोटारीच्या डिक्कीतून बादली काढून ती तेथील एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या रखवालदाराच्या घरात नेली. तेथे अन्य दोन साथीदारांच्या मदतीने मांडूळ जातीच्या सर्पाचे वजन करून चित्रीकरण व छायाचित्रे काढली. ती संबंधित खरेदीदाराला पाठविली. त्यानंतर दोघे संशयित मोटारीत बसण्यासाठी आले असता पथकाने त्यांच्यावर धाड टाकली. संशयित आरोपी पिराजी ज्ञानबा किर्ते (३०), वैज्यनाथ बालाजी सोनटक्के (३०, दोघे रा. परळी, जि.बीड) यांना ताब्यात घेतले असून त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या लॉकबमध्ये ठेवण्यात आले आहे.
----
दोघे फरार; पथक मागावर
रखवालदाराच्या घराची झडती घेतली असता या दोघा संशयितांचे अन्य दोन साथीदारा मांडूळाची बादली तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पाठीमागील दरवाजाने पळून जाण्यास यशस्वी ठरले. वनविभागाच्या पथकाने मांडूळ असलेली बादली जप्त करून दोघांना विभागीय कार्यालयात मुद्देमालासह हजर केले. त्यांच्या दोघा साथीदारांची ओळख पटली असून त्यांच्या मागावर पथक रवाना करण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

Web Title: Wildlife threatened by blind faith; Fraud smuggling was avoided by Forest Department vigilantes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.