Maharashtra Election 2019: गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:37 PM2019-10-05T16:37:56+5:302019-10-05T16:39:32+5:30

खरे तर बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय हा आजचा नव्हता.

Why did Balasaheb Sanap, who is close to Girish Mahajan, become such a condition? | Maharashtra Election 2019: गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?

Maharashtra Election 2019: गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?

Next

संजय पाठक 

नाशिक- नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार (राजीनामा दिल्याने आता माजी) बाळासाहेब सानप हे खरे तर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा उजवा हात. महाजन यांच्यापर्यंत पोहोचायचे असेल तर सानप हे महत्त्वाचे तद्वतच पालकमंत्र्यांना काहीही निर्णय घ्यायचा तर त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक विश्वासू म्हणजेच बाळासाहेब सानप अशी अवस्था होती. मात्र, दीड-दोनवर्षांपूर्वी हे चित्र बदलले, सानप यांच्याविरोधातील तक्रारी वाढल्या आणि त्याची परिणीती सानप यांना उमेदवारी डावलण्यात झाली. हे खरे असले तरी त्याचे पडसाद ज्या पद्धतीने पडलेत हे अधिक धक्कादायक झाले. यशोशिखरावर असलेल्या आणि मंत्रिपदाचे दावेदार ठरणाऱ्या सानप यांच्या घेतले गेलेल्या निर्णयामागे नक्की काय घडलं, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतात हे खरे असले तरी भाजपात केवळ उमेदवारी करण्याच्या दरम्यान, जे दोन ते तीन दिवस घडत होते ते कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे ठरले. नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. पक्षाने उमेदवारी घोषित करताना केवळ आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना उमेदवारी घोषित केली. पूर्व नाशिकमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांच्या उमेदवारीचा निर्णय राखीव ठेवला. याच दरम्यान, दोन नावांची प्रदेशाध्यक्षांच्या दरबारी चर्चा होत होती. त्यात स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे आणि दुसरे म्हणजे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले! आणि त्यात बाजी मारली ती राहुल ढिकले यांनी !

खरे तर बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय हा आजचा नव्हता. गेल्या पाच वर्षे आमदारकी भूषविताना त्यांना आपली उमेदवारी जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हे. गेल्या वीस-पंचवीस वर्षे भाजपात आलेले सानप तसे तर मूळ काँग्रेसी, परंतु नंतर भाजपात ते एकरूप झाले. त्यांची कार्यपद्धती आणि भाजपने त्यांना दिलेली संधी यामुळे एकेक करीत ते यशोशिखरावर पोहोचले. नगरसेवक, उपमहापौर, महापौर त्यानंतर आमदार असा त्यांचा प्रवास होताच, परंतु मंत्रिपदाचे संभाव्य दावेदारही त्यांना मानले गेले. आमदारकीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ते उजवा हात मानले गेले. त्यातच त्यांना भाजपात शहराध्यक्षपद दिले गेले. त्यातून खरे तर त्यांचे यश आणि अपयश असे दोहांचे बिजारोपण झाले. महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप त्यांच्या हाती होते आणि त्यानुसार त्यांनी पक्षाची सत्ता आणली. परंतु त्यात मूळ पक्षाचे नगरसेवक बोटावर मोजण्या इतकेच होते. त्यामुळे महत्त्वाची आणि आर्थिक सत्तेची पदेदेखील निवडणुकीच्या वेळी पक्षात आलेल्यांना दिली गेली. त्यांच्या हाताखाली ज्येष्ठांना काम करावे लागले. त्यातून उद््भवलेली खदखद सानप यांना मारक ठरली. परंतु संघटनेत वाढलेल्या त्यांच्या वर्चस्वामुळे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याने त्यांना कोणी जाब विचारला नाही. महापालिकेच्या सत्तेच्या साठमारीत सानप पुरते अडकले. परंतु सत्ता पदे वाटप, महापालिकेतील राजकारण आणि हस्तक्षेप या सर्वच प्रकारांतून सानप यांच्याविरोधात रोष वाढला आणि ते कितीही हाडाचे कार्यकर्ते असले तरी वरिष्ठांना त्याची दखल घेणे भाग पडले.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पक्षाने पुरस्कृत केलेल्या अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचा पराभव हा टर्निंग पॉइंट ठरला. सहाणे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. परंतु शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले आणि त्यांच्या विजयामागील कारणे शोधताना बाळासाहेब सानप यांच्या भूमिकेविषयी शंका घेतल्या गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हापासून सानप या प्रकरणात लक्ष घातले. त्यांच्या एकदा पक्षात नकारात्मकता सुरू झाली. मग, त्यांच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष झाले. सानप यांनी ज्यांना पक्षात आणले आणि नगरसेवक-सभापती केले, असेदेखील त्यांच्याविरोधात उभे ठाकले. आयारामांना दिलेल्या संधीमुळे नाराज झालेला मूळ ‘भाजपेयी’देखील त्यांच्या विरोधकांना मिळाले.

नाशिक महापालिकाच नव्हे तर देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड असो अथवा त्र्यंबक किंवा इगतपुरी नगरपालिका. जेथे पक्षाला काहीच स्थान नव्हते तेथे यश मिळवून देण्यापासून सर्व काही केले. परंतु हे सर्व झाकोळले गेले. आमदार निधीतून केलेली कामे किंवा विविध समाज घटकांसाठी केलेली विकासकामे हा सर्वच जमेच्या बाजूत धरला गेला नाही. मुदत संपूनही सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आले. त्यामुळे सानप यांचा पक्षातील उतरंडीचा प्रवास सुरू झाला. नाशिक शहरातील तीन मतदारसंघांपैकी एक ते दोन आमदारांची तिकिटे कापली जाणार अशी चर्चा सुरू झाली. यात बाळासाहेब सानप यांचे नाव आवर्जुन घेतले जाऊ लागले आणि अखेर घडले तेच अन्य दोन महिला आमदारांना संधी मिळाली, परंतु सानप यांना मात्र नाकारले गेले. दोन दिवस प्रतीक्षा करूनही उमेदवारी मिळाली नाही. अखेरीस मनसेतून आलेल्या आणि भाजपाशी पूर्वी कोणताही संबंध नसलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामागे अनेक कारणे आहेत. तीसेक वर्ष पक्षात घालवल्यानंतर सानप यांना भाजपातील प्रवासाला विराम द्यावा लागला.

 

Web Title: Why did Balasaheb Sanap, who is close to Girish Mahajan, become such a condition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.