विजेअभावी पिकांना देता येईना पाणी

By Admin | Updated: September 3, 2016 23:47 IST2016-09-03T23:42:53+5:302016-09-03T23:47:01+5:30

साकोरा : शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे

Water can not be given to non-deserving crops | विजेअभावी पिकांना देता येईना पाणी

विजेअभावी पिकांना देता येईना पाणी

नांदगाव : तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर विहिरींना पाणी उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मात्र वीजपुरवठ्यातील अनियमितपणामुळे पाणी असूनही पिकांना देणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतपंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.
तालुक्यातील जामदरी, नवे पांझण, मूळडोंगरी व साकोरा या गावांसाठी दोन वर्षांपूर्वी वीज उपकेंद्राला मान्यता मिळाली. या केंद्राच्या कुंपणासाठी केवळ भिंती उभारल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात उपकेंद्रासाठी मंजूर स्वतंत्र फीडर काही बसविले गेले नाही. श्रीनिवासन कंपनी या खासगी मक्तेदाराने याबाबत काम पूर्ण करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काम काही सुरू झाले नाही. त्यामुळे साकोरा भागातील शेतकऱ्यांना विजेसाठी नांदगावच्या फीडरवर अवलंबून राहावे लागते. सध्या पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना पाणी देण्याची गरज भासत आहे. एका बाजूला खंडित वीजपुरवठा, तर दुसऱ्या बाजूने मंजूर उपकेंद्र कार्यान्वित होत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, आबा इनामदार, साकोऱ्याचे उपसरपंच अतुल पाटील, देवदत्त सोनवणे, संजय सुरसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता रमेशचंद्र यांची भेट घेतली. साकोऱ्यासाठी मंजूर उपकेंद्र कार्यान्वित करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Web Title: Water can not be given to non-deserving crops