शहरातील बसस्थानकांची लागली वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:17 IST2019-09-28T00:16:55+5:302019-09-28T00:17:16+5:30
राज्य परिवहन महामंडळाची शहरातील बसस्थानके खड्डे आणि चिखलात हरविली आहेत. नियमित देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने किंवा अत्यंत सुमार कामांमुळे पावसाळ्यात बसस्थानकांत खड्डे पडतात आणि संपूर्ण स्थानके खड्ड्यात हरवून जातात.

शहरातील बसस्थानकांची लागली वाट !
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची शहरातील बसस्थानके खड्डे आणि चिखलात हरविली आहेत. नियमित देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने किंवा अत्यंत सुमार कामांमुळे पावसाळ्यात बसस्थानकांत खड्डे पडतात आणि संपूर्ण स्थानके खड्ड्यात हरवून जातात. अशी परिस्थिती गेली अनेक वर्ष सुरू असून, नेहमीच तात्पुरते काम हाती घेतले जाते.
पावसाळा संपला की दुरुस्तीचाही विसर पडतो. याच भूमिकेतून स्वच्छतेकडेदेखील पाहिले जात नसल्यामुळे शहरातील विस्तीर्ण स्थानके अक्षरश: गैरसोयीच्या समस्यांनी ग्रासले आहेत. स्थापत्य विभागाकडून नेमके काय केले जाते? असा प्रश्न या स्थानकांकडे पाहिल्यावर पडतो. शहरातील महामार्ग तसेच मेळा बसस्थानकातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. संपूर्ण रस्त्यावर खडी पडलेली आहेच शिवाय ठिकठिकाणी खड्डेदेखील पडले आहेत.
जुने सीबीएस स्थानकातील दोन्ही बाजूला खड्डे असून, यातून मार्गक्रमण करीत बसचालकाला बस काढावी लागते. स्थानिक कलाकारांनी स्वत:च्या खर्चातून स्थानकाची रंगरंगोटी केलेली असताना महामंडळाकडून मात्र स्वत:हून पुढे काहीच केले नाही. निदान असलेली चित्रे टिकविण्यासाठी तरी भूमिका घेणे अपेक्षित होते, मात्र तसे काहीच घडले नाही. याठिकाणी बसेस या खड्ड्यात आदळून प्रवाशांनादेखील त्रास सहन करावा लागतो.
४नवीन सीबीएस स्थानकातील खड्डे विचारायलाच नको. स्थानकाच्या पुढील बाजूस असलेल्या जागेवर मोठे खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी पाण्याने भरलेली डबकी खोल आहेत कोणत्याही बसस्थानकामध्ये सध्या काहीच नावीन्य उरलेले नाही. या स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे देण्यात आलेली आहे. परंतु इमारतीची पडझड किंवा दुरुस्ती करण्याची वेळ आली तर निधीसाठी पुन्हा पहिल्याप्रमाणे कार्यवाही करावी लागत आहे.
सुशोभिकरणाला प्राधान्य देण्याची गरज
महामार्ग, सीबीएस, नवीन बसस्थानक तसेच पंचवटीतील स्थानकही शहरातील प्रमुख बसस्थानके आहेत. त्यामुळे या स्थानकांच्या सुशोभिकरणाला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र काहीच होताना दिसत नाही. खड्डे आणि बसस्थानक हे समीकरण अतूट झाले की काय, अशी शंका निर्माण होते.
४स्थानकातच पडलेले खड्डे, शौचालयांची दुरवस्था, पाण्याची नासाडी, भिकाऱ्यांचा उपद्रव, रात्रीच्या सुमारास समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींकडून स्थानकाचा घेतला जाणारा ताबा अशा अनेक मुद्द्यांवर महामंडळानेच लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते.