कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ६ वाजता हजार क्यूसेकने पाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीपात्रातील व काठावरील पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे.दि. १६ ते २६ नोव्हेंबरदरम्यान चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचनासाठी सोडण्यात आले असून, चणकापूर धरणाचे आवर्तन सुटल्याने गिरणाकाठावरील गावांना जाणवणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होणार आहे. गिरणाकाठच्या गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने सातत्याने पाणी सोडण्याबाबत देवळ्याचे आमदार डॉ. राहुल अहेर, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ठराव करून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना सादर करून पाणी सोडण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मालेगाव पाटबंधारे विभागाने दि. १ नोव्हेंबर रोजी पाणीटंचाई संदर्भातील सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना सादर केल्याने पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिले.(पान ३ वर)चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायतीसह दाभाडीतील १२ गावे, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेगोंडा, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी दहा दिवसांच्या कालावधीत ४०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी सोडण्यात आले असून, सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आले.मालेगाव लघुपाटबंधारे विभागाने प्रथम पाणीपट्टी भरून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, दहा दिवसांच्या आवर्तन काळात पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत आदेशदेखील जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. पाणी आरक्षण केलेल्या सर्व गावांना पाणी पोहोचेल याची दक्षता मालेगाव पाटबंधारे विभागाने घ्यायची असून, कळवण, देवळा, बागलाण व मालेगाव तालुक्यातील अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत मालेगाव पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची सूचना महावितरणचे कळवण, मालेगाव, बागलाण व देवळा येथील यंत्रणेला करण्यात आली आहे.पाण्याच्या सिंचनासाठी अनधिकृत उपसा होणार नाही याकरिता मालेगाव पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करावी व साठवण तलावातून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही यासाठी सुरक्षारक्षक नेमणूक करण्याची सूचना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी कळवण नगरपंचायत व सटाणा नगर परिषदेला केली आहे. मालेगाव पाटबंधारे विभाग, महावितरण व नगरपंचायत, नगर परिषद यांच्या मागणीनुसार आवर्तन काळात आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना पोलीस अधीक्षक डॉ. संदीप दराडे यांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केली आहे.शेतकरी बांधवांमध्ये समाधानजनतेच्या मागणीची दखल घेऊन ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय मालेगाव पाटबंधारे विभागाच्या सकारात्मक अहवालानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी घेतल्यामुळे कसमादे पट्ट्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. कळवण, नवी बेज, जुनी बेज, पाळे, अभोणा, नाकोडे, मानूर, पाटविहीर, पाळे, वाडी, कळमथे, पिळकोस, सावकी, दह्याणे, गोसराणे आदी तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव करून चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.
कसमादे परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:24 IST
कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ६ वाजता हजार क्यूसेकने पाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीपात्रातील व काठावरील पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
कसमादे परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार
ठळक मुद्देदिलासा : चणकापूर धरणातून दहा दिवसांसाठी आवर्तन