वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:23 IST2023-03-20T19:23:04+5:302023-03-20T19:23:15+5:30
सुरगाणा तालुक्यातील सराड येथे सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना
श्याम खैरनार
सुरगाणा (जि. नाशिक) : सुरगाणा तालुक्यातील सराड येथे सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये (७०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सावळीराम भोये हे आपल्या शेतात घरातील कोणालाही न सांगताच सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. याच सुमारास अंगावर वीज पडल्याने गोये यांचा जागीच मृत्यू झाला.
सायंकाळी घरच्यांनी शेतात व परिसरात शोधाशोध केली असता ते सापडले नाही. ते नेहमी भजनाला जात असल्याने ते भजनाला गेले असावेत सकाळी घरी परत येतील, असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र शेतात शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्यात गवत झुडपात त्यांचा मृतदेह दिसला. त्यांच्या डोक्याला व अंगावर वीज पडून भाजल्याचे आढळून आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन भोये यांचे ते वडील होते. या दूर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.