विनाकारण फिरणाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 00:59 IST2021-04-26T00:55:36+5:302021-04-26T00:59:57+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तृतीयपंथीय विनाकरण फिरणाऱ्यांना समज देत आहेत.

विनाकारण फिरणाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून समज
नाशिकरोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तृतीयपंथीय विनाकरण फिरणाऱ्यांना समज देत आहेत.
गेल्या सव्वा वर्षापसून कोरोनाच्या थैमानामुळे शासकीय यंत्रणेपासून सर्वजण हतबल झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याकाळात कोणीही विनाकारण रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करूनसुद्धा रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे नाशिकरोडपोलिसांनी बिटको चौकात नाकाबंदी केली असून, बिटको चौकात मुक्तिधामकडून येणारा रस्ता गायकवाड मळा व हॉटेल महाराष्ट्र येथे बांबू बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बिटको चौकातील देवळाली कॅम्पला जाणाऱ्या बसथांब्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात आहे. याच ठिकाणी पोलिसांनी तृतीयपंथीयांची मदत घेतली आहे.
नाकाबंदीच्या कामात पोलिसांना मदत
बिटको चौकात नाकाबंदीच्या कामात पोलिसांना सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत मदत करत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अडविल्यानंतर तृतीयपंथी संबंधितांची कुठल्या कामाकरता बाहेर निघाले म्हणून विचारपूस करत आहे. शासन व पोलीस तुमच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी झटत असून, विनाकारण घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडला तर कोरोना तुम्ही घरी घेऊन जाल, अशी सूचना तृतीयपंथी वाहनधारकांना करत आहे. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी, शीला पायल नंदगिरी, रुद्रमहा पायल नंदगिरी, दीपाली पायल नंदगिरी, निलम पायल नंदगिरी, राखी पायल नंदगिरी हे तृतीयपंथी पोलीसांना मदत करीत आहे.