गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 22:14 IST2025-04-16T22:12:40+5:302025-04-16T22:14:38+5:30
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: आपलेही लोक असतात इकडे-तिकडे. त्यांच्याकडे काय चालले आहे, हे मला दररोज कळते, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या बुथ लेव्हलच्या कामाचा सर्व तपशीलच भरसभेत वाचून दाखवला.

गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या शिबिरासाठी आले होते. या शिबिरात संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भरसभेत भाजपाच्या संघटन कौशल्याचा एक नमुनाच सादर केला आणि भाजपाच्याच धर्तीवर संघटना उभी करण्याबाबत उपस्थितांना कानमंत्र दिला.
निर्धार शिबिरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली तयारी कशी पाहिजे. सकाळी विनायक राऊतांनी बुथ मॅनेजमेंटचे मार्गदर्शन केले. माझ्याकडे भाजपा महाराष्ट्र, बुथ समिती गठण संदर्भात तपशील आहे. हे मुंबईचे आहे. आपलेही लोक असतात इकडे-तिकडे. त्यांचीच लोक आपल्याकडे असतात, असे काही नाही. त्यांच्याकडे काय चालले आहे, हे मला रोज कळते. त्यांनी कशी केली आहे मांडणी हे मुद्दाम सांगतो. माझ्याकडे सर्व विभाग आहे. सर्व सांगणार नाही. नाही तर कोणी पाठवले ते कळेल. त्यात जबाबदारीचा एक विषय आहे. हे सारे मुंबईचे आहे, असे सांगून भाजपाच्या बुथ समितीत काय चालते, याचा तपशीलच उद्धव ठाकरेंनी भरसभेत वाचून दाखवला.
अशी तयारी आपण केली पाहिजे
भाजपाकडे एक बुथ अध्यक्ष आहे. त्याच्यापुढे त्या व्यक्तीचे नाव आणि मोबाइल नंबर आहे. नंतर बुथ सरचिटणीस आहे. त्यांचे पूर्ण नाव आणि मोबाइल नंबर आहे. मग सदस्य आहेत. लाभार्थी प्रमुखही आहेत. लाभार्थी प्रमुखाचेही नाव आणि मोबाइल नंबर आहे. त्यांनी सदस्यांच्या रकान्यात त्यांनी दहा सदस्यांची नावे दिली आहेत. प्रत्येकाचे पूर्ण नाव आणि मोबाइल नंबर, अशी त्यांची तयारी आहे. अशी तयारी आपण केली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुढे त्यांनी एक सूचना दिलेली आहे की, १२ सदस्यांमध्ये किमान ३ महिला प्रतिनिधी असाव्यात. नंतर किमान एक एससी आणि एसटी प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे. या मांडणीने ते पुढे चालले आहेत. ईव्हीएम घोटाळा आहे. तो जरूर आहे. योजनांचे गारूड नक्की आहे. पण बुथ मॅनेजमेंटही महत्त्वाचे आहे. आपले बुथ प्रमुख आणि पोलिंग एजंट यांना ट्रेनिंग दिले पाहिजे. बुथ प्रमुख हा यादीतील प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे. त्या टीममधला एक पोलिंग एजंट पाहिजे. असेल तर त्याला कळले पाहिजे की, मतदानाला आलेला माणूस मतदानाच्या यादीतला आहे की नाही. त्याचा चेहरा जुळतोय की नाही, अशी तपशीलवार माहिती देत उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यावर भर दिला. आता याचाच पूरेपूर उपयोग आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे करतील का आणि भाजपाचाच फॉर्म्युला वापरून भाजपालाच शह देण्यासाठीची रणनीती यशस्वी होईल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.