टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:51 IST2018-11-12T17:51:11+5:302018-11-12T17:51:29+5:30
सिन्नर-संगमनेर महामार्गावर दुचाकी आणि दुधाचा टॅँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास मनेगाव फाट्याजवळ घडली.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिन्नर : सिन्नर-संगमनेर महामार्गावर दुचाकी आणि दुधाचा टॅँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास मनेगाव फाट्याजवळ घडली.
रवींद्र शिवाजी कोठुळे (३२, रा. विहितगाव, नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दुचाकीच्या पाठीमागे बसलेली त्याची आई सत्यभामा शिवाजी कोठुळे (५२) ही गंभीर जखमी झाली. शरद कोठुळे व त्याची आई सत्यभामा कोठुळे अॅक्टिव्हावरून (एमएच १५ एएल ८३४०) नाशिकरोडकडे येत होते. याचवेळी राजहंस दुधाचा टॅँकर (एमएच १७ बीडी ६९८७) हा संगमनेरकडे जात असताना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास या दोन्ही वाहनांमध्ये जोराची धडक झाली.
अपघातात दुचाकीस्वार शरद कोठुळे हा गंभीर जखमी झाल्याने तो गतप्राण झाला. त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची आई गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.