नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 08:42 IST2025-10-19T08:42:08+5:302025-10-19T08:42:18+5:30
नाशिकमध्ये कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये पडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
Nashik Karmabhoomi Express : रेल्वे स्थानकाजवळील जेलरोड पवारवाडी जवळ शनिवारी रात्री कर्मभूमी एक्सप्रेस या धावत्या रेल्वेमधून पडल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत व जखमींची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेली व बिहार राज्यातील रस्तोलकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस गाडी क्रमांक १२५४६ ही शनिवारी रात्री आठ वाजून १८ मिनिटांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आली.
काही वेळाने कर्मभूमी एक्सप्रेस पुढे निघाल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील पवारवाडी जवळील साईनाथ नगर येथील मारुती मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. कर्मभूमी एक्सप्रेस या धावत्या रेल्वेतून पडलेले दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. या घटनेत आणखी एक प्रवासी रेल्वे खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. सध्या दिवाळीमुळे रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. धावत्या रेल्वेतून तिघेजण खाली पडल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे साईनाथ नगर भागातील रेल्वे लाईनजवळ राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी या अपघाताची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानक उपप्रबंधक कार्यालयात दिली. रेल्वे पोलीस व नाशिकरोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रेल्वेतून पडल्याने मृत आणि जखमी झालेल्यांकडे त्यांची ओळख पटवणारी कुठलीच कागदपत्रे नसल्याचे निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळी सणामुळे मुंबई भागात काम करणारे हे तिघेजण बिहारला आपल्या गावी जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, दिवाळी आणि छठनिमित्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे. लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकापासून ते देशभरातील इतर शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. बिहार, उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांब रांगा लागत आहेत.