नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:53 IST2025-08-11T19:51:53+5:302025-08-11T19:53:05+5:30
मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटानजिक असलेल्या एका हॉटेलमध्ये शिंदेसेनेच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
नाशिक (दिनेश पाठक) : मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटानजिक असलेल्या एका हॉटेलमध्ये शिंदेसेनेच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. सोमवारी (दि.११) दुपारी ४ वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसात भिडल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ उडाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. यानंतर शिंदेसेनेचे अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या बाबूशेठ टायरवाल यांच्यात वाद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या मदतीने वाद मिटविण्यात आला.
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
सोमवारी (दि. ११) नाशिक येथे धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य मुख्य पदाधिकारी बैठकीआ उपस्थित होते. बैठक आटोपल्यावर तेथेच वादावादी सुरू झाली. त्यात दोन, तीन पदाधिकारी बाहेर पडले. ज्यांच्यात वाद झाला तेही एकमेकांवर ताेंडसुख घेत बाहेर पडले अन् बाहेर लॉन्समध्ये एकमेकांंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. आतमधून मंत्री उदय सामंत यांनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलच्या बाहेर जाण्याचा निरोप पाठविला. तेव्हा सुरक्षा रक्षक व पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी वाद झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळदेखील केली.
‘तो’ पदाधिकारी कर्जत तालुक्याचा?
कर्जत तालुक्यातील (जि.आहिल्यानगर) शरद पवार गटाचा एक कार्यकर्ता बैठकीत शिरला होता. त्याला आम्ही हटकले असता त्याच्यासाेबतच्या कार्यकर्त्यांनी ओरडण्यास सुरूवात केली, अशी प्रतिक्रिया आहिल्यानगर येथील पदाधिकाऱ्याने दिली. तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी आमच्याच पक्षातील हा किरकाेळ वाद असल्याचे सांगितले.
उदय सामंत यांच्याकडून इन्कार
शरद पवार गटाचा कोणताही कार्यकर्ता बैठकीत शिरला नव्हता. अहिल्यानगर येथील आमच्याच पदाधिकाऱ्यांत किरकोळ वाद झाला. मात्र पक्ष याची योग्य दखल घेणार असून, वादाचा व्हिडीओ तपासून संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.