दहावीची परीक्षा संपल्याच्या आनंदात दोन मित्र घरी निघाले, पण वाटेत मृत्यूने गाठले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:10 IST2025-03-21T16:09:22+5:302025-03-21T16:10:17+5:30
आयुष जागीच गतप्राण झाला तर साहिल बाविस्कर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर डॉ. वसंत पवार वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

दहावीची परीक्षा संपल्याच्या आनंदात दोन मित्र घरी निघाले, पण वाटेत मृत्यूने गाठले!
Nashik Accident : दहावीची परीक्षा संपल्याने आनंदात दोघे मित्र दुचाकीने आगरटाकळी रोडकडून अमृतधामच्या दिशेने जात असताना झालेल्या विचित्र अपघातात दोघा शाळकरी मित्रांचा मृत्यू झाला. आयुष सोमनाथ तांदळे आणि प्रमोद बाविस्कर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मित्र दहावीची परिक्षा संपली, पेपर चांगले गेल्याच्या आनंदात होते. याच आनंदात आगरटाकळीकडून ते मंगळवारी दुचाकीने दुपारच्या सुमारास प्रवास करत होते. समोरून आलेल्या मालवाहू रिक्षाच्या चालकाने दुचाकीला धडक दिली. या धडकेने दोघेही रिंगरोडवर रस्त्यावर कोसळले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने दोघांना चिरडले. आयुष जागीच गतप्राण झाला तर साहिल बाविस्कर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर डॉ. वसंत पवार वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्याचे निधन झाले.
दरम्यान, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालक गणेश तुकाराम गाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुषच्या पश्चात आई, वडील आजी, बहिणी असा परिवार आहे. साहिलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
सोबत जेवणाचा आनंद घेता आला नाही..
आयुष, साहिल या दोघांना त्यांच्या एका शाळकरी मित्राला भेटायचे होते. तेथून हे तिघे मित्र हॉटेलमध्ये एकत्र जेवणासाठी जाणार होते; मात्र नियतीला हे मान्य नसावे, त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि दोघा अल्पवयीन मुलांना प्राण गमवावे लागले.