Two die in diarrhea in Savarpada | सावरपाड्यात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू

सावरपाड्यात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू

ठळक मुद्देदूषित पाण्यामुळे ८५ लोक बाधित

कळवण/कनाशी : कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे ८५ लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काहींची रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सावरपाडा येथे पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामामुळे सावरपाडा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्याने गावाला दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गॅस्ट्रोची गावात लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला. गावात बुधवारी रात्री १ वाजेपासून दूषित पाण्यामुळे ९० जणांना त्रास सुरू झाला. १०५८ लोकसंख्या असलेल्या गावातील १२३ घरांना सार्वजनिक विहीर, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, तीन हातपंपद्वारे पाण्याचापुरवठा होतो.
जयदर आरोग्य केंद्रात १७, कळवण उपजिल्हा रुग्णालयात १९ रु ग्णांना दाखल करण्यात आले आहे. सावरपाडा गावात ४२ रुग्णावर औषोधोपचार सुरू आहेत. गटविकास अधिकारी बहिरम, डॉ. सुधीर पाटील व आरोग्य कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

Web Title: Two die in diarrhea in Savarpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.