भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; झाडाला आदळून ट्रकनेही पेट घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:48 IST2022-03-05T17:04:04+5:302022-03-05T18:48:50+5:30
जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हा मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करीत असतात

भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; झाडाला आदळून ट्रकनेही पेट घेतला
नाशिक - मोखाडा तालुक्यातील नाशिक जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात दोन बालक चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान चालकाने घाईघाईने ट्रक पुन्हा मागे घेतला एक जण गंभीर जखमी झाला, तर तेथील एका दुकानाला सुद्धा धडक दिली, यात दुकानाचे पत्रे तुटले असून, मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे त्यानंतर झाडाला आदळून ट्रकनेही पेट घेतला.
जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हा मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करीत असतात. दुपारी 3.17 मिनिटांनी जव्हारहून नाशिकच्या दिशेने जात होता, चालक नशेत होता, त्याने वाहन हायगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात आरोही नकुल सोनार (वय 5 वर्ष), पायल भालचंद्र वारघडे (वय 9 वर्षे) या दोन्ही मुली जागीच ठार झाल्या आहेत, तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून, त्याला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा निषेध नोंदविता स्थानिकांनी रस्ता रोको सुरू केला आहे. दरम्यान वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली आहेत.