आदिवासी : वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव
By Admin | Updated: February 25, 2015 23:20 IST2015-02-25T23:20:03+5:302015-02-25T23:20:41+5:30
विद्यार्थिनींचा तहसीलमध्ये ठिय्या

आदिवासी : वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव
सटाणा : शहरातील नवीन शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात कोणत्याही मूलभूत सुविधा नसून निकृष्ट जेवणाबरोबरच येथील अधीक्षिका विद्यार्थिनींना शिवीगाळ करून मानिसक छळ करत असल्याच्या निषेधार्थ वसतिगृह व्यवस्थापनाच्या विरोधात सर्व विद्यार्थिनींनी तहसील कार्यालयात तासभर ठिय्या देत तहसीलदारांना निवेदन दिले; मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणताही न्याय या विद्यार्थिनींना न मिळाल्याने सर्व विद्यार्थिनी कळवण येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात पायी निघाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे आदिवासी वसतिगृहांच्या समस्या
पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. सटाणा शहरात देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टच्या इमारतीत शासकीय आदिवासी मुलींचे नवीन वसतिगृह आहे. या वसतिगृहात बागलाण तालुक्यासहित आजूबाजूच्या तालुक्यांतील २५० विद्यार्थिनी राहतात. मात्र सर्वच विद्यार्थिनी वसतिगृह व्यवस्थापनच्या मनमानीला वैतागल्या असून, मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सर्व विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र आदिवासी वसतिगृहासंदर्भात आम्ही हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगून तुमच्या समस्यांची माहिती आम्ही आदिवासी प्रकल्प कार्यालयाला कळवतो असे सांगत निवेदन स्वीकारण्याचा सोपस्कार पार पाडला. सायंकाळपर्यंत अधिकारी वसतिगृहात येऊन चौकशी करेल या आशेवर असलेल्या विद्यार्थिनींचा भ्रमनिरास झाल्याने सर्व विद्यार्थिनींनी एकीचे दर्शन घडवीत
५ वाजता कळवणचे आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला.
विंचूर - प्रकाशा राज्यमार्गावरून एका रांगेत कळवणच्या दिशेने पायी निघालेल्या या आदिवासी विद्यार्थिनीसमवेत एकही पुरुष व्यक्ती नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, कळवण आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यांनी रजेवर असल्याचे कारण पुढे करून हात वर केले आहेत. (वार्ताहर)