गर्भपातासाठी आदिवासींचे गुजरात कनेक्शन?; आरोग्य विभागाला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 03:28 IST2019-12-14T03:27:55+5:302019-12-14T03:28:38+5:30
सुरगाणा तालुक्यात माता-बालमृत्यूतही वाढ

गर्भपातासाठी आदिवासींचे गुजरात कनेक्शन?; आरोग्य विभागाला संशय
नाशिक : आदिवासी सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा संशय आरोग्य खात्याला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आरोग्याच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच या तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचे लक्षात आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असले तरी, सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी हजारी ९०८ इतकाच आहे. मुलींचे घटते प्रमाण पाहता, आदिवासी समाजातही मुलगी नको असा मतप्रवाह निर्माण होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली असावी.
तसेच गर्भपाताला प्रोत्साहन मिळत असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केला आहे. तेथे गर्भपात करून देणारी यंत्रणा कार्यान्वित असावी असा आरोग्य खात्याला संशय आहे. सुरगाणा तालुक्यात बाळंतपणात महिला मृत्यूचे तर बालमृत्यूचे प्रमाणही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असून, या वर्षी १६९ मृत्यू झाले. त्यास प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व दारूचे व्यसन या दोन्ही गोष्टी कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.