दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील नागरी वस्तीत असलेले देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी मंगळवारी (दि.११) महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे, तालुका अध्यक्ष सुमन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.जानोरी येथे सहा महिन्यांपूर्वी देशी दारू पिल्याने एका नागरिकाचा बळी गेला होता. त्यावेळी येथील महिलांनी दिंडोरी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. त्याचवेळी दुकान हटविण्यासाठी दुकान मालकास पाच महिन्यांची मुदत पोलिसांच्या मध्यस्थीने देण्यात आली होती. मात्र मुदत संपूनही दुकान स्थलांतरित झाले नाही म्हणून मंगळवारी जानोरी येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला.यावेळी दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे, तालुकाध्यक्ष सुमनबाई घोरपडे, लता वाघ, मंदा रोंगटे, अशा चारोस्कर, बेबी नाडेकर, सिंधूबाई धोंगडे, अलका ब्राह्मणे, सिंधूबाई कोरडे, सुनंदा विधाते, मंगला वाघ, अलका वाघ, विमल उंबरसाडे आदींसह महिला उपस्थित होत्या.
जानोरीतील दारू दुकान हटविण्यासाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:14 IST