आडगाव शिवारातील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:45 IST2018-12-29T21:44:35+5:302018-12-29T21:45:11+5:30
नाशिक : दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, अॅक्टिवा दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारातील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी ...

आडगाव शिवारातील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
नाशिक : दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, अॅक्टिवा दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारातील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यमुनाबाई गोसावी या कुटुंबीयांसह राहतात़ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सफेद रंगाच्या अॅक्टिवा दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी गोसावी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ यानंतर घरातील वरच्या मजल्यावर असलेले कपाट व शोकेसमधून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीची देवी, चांदीची चेन असे ३८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाचा मोबाइल खेचला
नाशिक : दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पादचारी तरुणाचा मोबाइल खेचून नेल्याची घटना हॉलमार्क चौकात शुक्रवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र देसले (२१, रा. कॉलेजरोड) हा तरुण रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घराकडून हॉलमार्क चौकाकडे पायी जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी देसले यांच्याकडील मोबाइल खेचून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीएसजवळून दुचाकीची चोरी
नाशिक : अशोकनगर जाधव संकुलमधील राधाई हौसिंग सोसायटीतील रहिवासी अर्जुन पारुळेकर यांची पाच हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी (एमएच १५, सीएक्स ३७५८) चोरट्यांनी जुने सीबीएसजवळील एऩडी़सी़सी़ बँकेसमोरून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़