मतदार याद्यांकडे राजकीय पक्षांची पाठ
By Admin | Updated: October 12, 2016 22:04 IST2016-10-12T21:55:44+5:302016-10-12T22:04:55+5:30
मतदार याद्यांकडे राजकीय पक्षांची पाठ

मतदार याद्यांकडे राजकीय पक्षांची पाठ
नाशिक : एरव्ही मतदार यादीत नाव नसल्यास त्याचे राजकीय भांडवल करून प्रशासन यंत्रणेवर आगपाखड करणाऱ्या राजकीय पक्षांचे मतदारांविषयीचे बेगडी प्रेम उघड झाले असून, निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदार संघनिहाय प्रारूप यादी ताब्यात घेण्यास राजकीय पक्षांनी पाठ फिरविली आहे. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता मोफत दिल्या जाणाऱ्या या मतदार याद्या राजकीय पक्षांनी तपासून त्यातील त्रुटी यंत्रणेच्या निदर्शनास आणून देणे अपेक्षित धरण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून ज्या ज्या वेळी मतदार पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतले जातात त्या त्या वेळी राजकीय पक्षांना विश्वासात व त्यांच्या सहकार्याने ते राबविण्यावर भर दिला जातो. मतदारांची नोंदणी, स्थलांतर, नाव व पत्त्यात बदल यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्यावत करण्यासाठी वर्षातून दोन वेळेस ही मोहीम हाती घेतल्यानंतर या मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादी अद्ययावत केल्यानंतर ती मतदारांना पाहण्यासाठी मतदान केंद्रावर ठेवली जाते. त्याचप्रमाणे त्याची एक प्रत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झालेल्या राजकीय पक्षांनाही मोफत दिली जाते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नाशिक जिल्ह्यात १६ सप्टेंबर रोजी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत व या याद्यांच्या आधारेच डिसेंबर अखेर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत नाव असलेल्या मतदारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार आहे. (प्रतिनिधी)