आडगाव येथील दूरध्वनी यंत्रणा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:49 IST2018-07-03T00:49:25+5:302018-07-03T00:49:45+5:30
आडगाव परिसरातील दूरध्वनी सेवा कोलमडल्याने नागरिकांसह पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आडगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनी असूनही तो लागत नसल्याने फोन असूनही त्याचा उपयोग नसल्याची ओरड खुद्द आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आडगाव येथील दूरध्वनी यंत्रणा कोलमडली
पंचवटी : आडगाव परिसरातील दूरध्वनी सेवा कोलमडल्याने नागरिकांसह पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आडगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनी असूनही तो लागत नसल्याने फोन असूनही त्याचा उपयोग नसल्याची ओरड खुद्द आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातील दूरध्वनीबाबत येणाºया अडचणी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या कानावर टाकूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल खुद्द पोलीस कर्मचारी करताहेत. पंचवटी पोलीस ठाण्याची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र आडगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला श्री स्वामी नारायण पोलीस चौकीतच पोलीस ठाणे सुरू करण्यात आले त्यानंतर काही महिन्यांनी आडगाव येथील भारत संचार दूर निगमच्या कर्मचारी वसाहतीतच भाडेतत्त्वावर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने आडगाव पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र जागेचा शोध सुरू केला. मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम परिसरात असलेल्या एका इमारतीच्या मागील बाजूला जागा मिळताच त्याठिकाणी सुसज्ज पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. मात्र याच पोलीस ठाण्यात इंटरनेट कनेक्शन असलेला दूरध्वनी जोडणी केलेली असल्याने दूरध्वनी केल्यास केवळ एकच बेल वाजते त्यानंतर बेल वाजूनही फोन उचलला जात नसल्याने नागरिकांची अडचण होते. पोलिसांची तत्पर मदत पाहिजे असल्यास फोन करूनही फोन लागत नसल्याची खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. फोन लागत नसल्याची ओरड केवळ नागरिकांची नाही, तर पोलीस कर्मचाºयांचीच असल्याने पोलीस प्रशासन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.