देवळा : तालुक्यातील जनतेच्या मागणीनंतर तहसील कार्यालय पुन्हा शहरात पूर्वीच्या जागी यावे या मागणीसाठी आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या नेतृत्वाखालील देवळा तालुक्यातील शिष्टमंडळाने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला की काय, अशी भावना तालुकावासीयांमध्ये व्यक्त केली जात आहे. दुय्यम निबंधक कार्यालयदेखील आता नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले आहे. मुद्रांक विक्रेते व सेतू कार्यालय अद्यापही जुन्या जागेवर शहरात, तर तहसील कार्यालय शहराबाहेर तीन कि.मी. अंतरावर असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गतवर्षी जिल्हा परिषद निवडणुकीचे औचित्य साधून शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले तहसील कार्यालय शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात आले.
तहसील कार्यालय : मुद्रांक विक्रेते, सेतू कार्यालय शहरातच महसूलमंत्र्यांना विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:05 IST