मोक्कातील आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:28 IST2018-10-27T00:28:07+5:302018-10-27T00:28:34+5:30
न्यायालयातील सुनावणीनंतर मोक्कातील तिघा आरोपींना पोलीस ठाणे व मध्यवर्ती कारागृहात नेले जात असताना यातील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस वाहनावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास घडली़

मोक्कातील आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिकरोड : न्यायालयातील सुनावणीनंतर मोक्कातील तिघा आरोपींना पोलीस ठाणे व मध्यवर्ती कारागृहात नेले जात असताना यातील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस वाहनावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास घडली़ गुरु अर्जुन भालेराव (रा. येवला, जि. नाशिक), सागर गणेश मरसाळे (२७, रा. मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी मोक्का गुरु भालेराव, सागर मरसाळे व विनोद गणेश मरसाळे (३२, रा. धुळे) या मोक्कातील आरोपींच्या सुनावणीची तारीख होती़ न्यायालयाने सायंकाळी या तिघांबाबत आदेश दिल्याने त्यांना कैदी पार्टीचे अधिकारी व कर्मचारी नाशिकरोड पोलीस ठाणे व नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात होते़
या तिघांना पोलीस वाहनात (एमएच १८, जी १७४) बसविले असता संशयितांनी धुळे पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सोनवणे व त्यांच्या साथीदार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली़ संशयित गुरु भालेराव व सागर मरसाळे या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ तसेच हातापायी करून स्वत:चे डोके पोलीस वाहनावर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला़