गोंदे दुमाला (इगतपुरी) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेलगाव तऱ्हाळे येथील शेतकरी अशोक किसन वारुंगसे यांच्या गट नं. ९२४ या क्षेत्रातील एक एकर काकडी पिकावर अज्ञात इसमाने शुक्रवारी रात्री तणनाशकाची फवारणी केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी अशोक वारुंगसे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात याआधी देखील अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी पिकांवर तणनाशकाची फवारणी करून पिकांचे नुकसान केल्याच्या घटना माणिकखांब, भरविहीर बुद्रुक या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. वारुंगसे यांचे काकडी पीक नुकतीच फळ धारणेवर आली होती. बाजारात काकडी पिकाला बाजारभाव असल्याने त्यांनी काकडीची लागवड केली होती. शेतात हजारो रुपयांचे मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी जोमदार काकडी तयार केली होती. मात्र, कुणीतरी पूर्ववैमनस्यातून वारुंगसे यांच्या शेतातील उभ्या काकडीवर रात्री अंधाराचा फायदा घेऊन तणनाशक फवारणी करून काकडीचे नुकसान केले. दुसऱ्या दिवशी शेतात चक्कर मारून बघितले असता, काकडीची वेल पूर्णपणे कोमेजून चालली असल्याचे बघून वारुंगसे हतबल झाले. याबाबत त्यांनी घोटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, शनिवारी कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर व तलाठी यांनी शेतावर जाऊन पंचनामा केला असून, नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------------------
कर्ज काढून हजारो रुपयांच्या जंतुनाशक औषधांची फवारणी तसेच महागडे मल्चिंग पेपर व ड्रिपचा खर्च करत काकडीची झाडे पोटच्या पोराप्रमाणे जगवली. नुकतेच फुले आलेल्या काकडीच्या झाडांवर अज्ञात व्यक्तींनी तणनाशकाची फवारणी केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आता जगायचे कसे असा प्रश्न उभा राहिला असून मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
- अशोक वारुंगसे, शेतकरी, बेलगाव तऱ्हाळे
----------------------------
बेलगाव तऱ्हाळे येथील शेतकऱ्याच्या काकडीवर अज्ञात व्यक्तींकडून तणनाशकाची फवारणी केल्याने काकडी पिकाचे झालेले नुकसान. (१८ गोंदे काकडी)
180921\18nsk_1_18092021_13.jpg
१८ गोंदे काकडी