राज्यातील उर्दू शिक्षक भरतीवर विशेष लक्ष देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:49 IST2020-12-16T19:44:37+5:302020-12-17T00:49:14+5:30
मालेगाव : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा भरण्यावर विशेष लक्ष देऊ तसेच दुसऱ्या शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी टीईटी परीक्षेसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.

राज्यातील उर्दू शिक्षक भरतीवर विशेष लक्ष देणार
मुंबई येथे अधिवेशनात राज्य सरचिटणीस साजीद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेतली. उर्दू शिक्षक संघाचे १६१ दिवस राहत्या घरी धरणे आंदोलन, डिग्री जलाव आंदोलन, संकल्प दिवस, बेरोजगार दिवस आंदोलन, पोस्ट कार्ड आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने शिक्षक भरतीला विशेष परवानगी दिली, राज्यात शिक्षणसेवक भरती पवित्र प्रणालीमार्फत सुरू करण्यात आली होती, या भरतीमध्ये उर्दू माध्यम शिक्षक पदभरतीकरिता ९६६ एवढ्या तुटपुंज्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त २६९ पदे भरण्यात आली असून, ६९७ जागा रिक्त राहिल्या, या जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करूनसुद्धा दुसऱ्या टप्प्यात फक्त १७७ पदे भरून ५२० च्या जवळपास जागा रिक्त ठेवून उर्दू माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उर्दू माध्यमासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षणसेवक पदभरतीसाठी दुसरा टप्पा सुरू करण्यास परवानगी देऊन, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टीईटी परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी उर्दू शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.