सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:37 IST2026-04-07T11:00:03+5:302026-04-07T11:37:58+5:30
नाशिकमधल्या रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी मिळाल्या आहेत.

सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
Nashik Ravindra Erande:नाशिकमध्ये पत्रकार आणि कन्सल्टंट म्हणून मिरवणाऱ्या रवींद्र नारायण एरंडे (वय ६३) याच्या काळ्या कृत्यांचा एकामागून एक धक्कादायक खुलासा होत आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एरंडेच्या सातपूर इथल्या त्याच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. एरंडे तिथे फक्त अश्लील कृत्य नव्हे तर भोंदुगिरीही करत होता. त्याच्या ऑफिसमध्ये भोंदूगिरीसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
कार्यालयात सुरु होती भोंदूगिरी?
रवींद्र एरंडे हा सातपूर परिसरात स्वतःला समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणवून घेत असे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो पाहून कोणालाही त्याच्या खऱ्या कृत्याचा संशय येत नसे. पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयाची झडती घेतली असता तिथे सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष आणि कवड्या यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. नोकरीचे आमिष दाखवून किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांवर या वस्तूंचा वापर करून भोंदूगिरी करत होता का? या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत. अशोक खरात प्रकरणाप्रमाणेच एरंडेने देखील महिलांना भीती दाखवून किंवा भूलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे.
स्वतःच्याच ऑफिस बॉयने फोडले बिंग
स्वतःचे पाप लपवण्यासाठी एरंडेने सुरुवातीला काही लोक मला १२ लाखांची खंडणी मागून ब्लॅकमेल करत आहेत, असा बनाव रचला होता. मात्र, त्याच्याच ऑफिस बॉयने रचलेल्या सापळ्यात तो स्वतःच अडकला. पोलिसांनी जप्त केलेल्या पेनड्राइव्ह आणि डीव्हीडीमध्ये १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह फोटो सापडले. या भक्कम पुराव्यांमुळे एरंडे फसला आणि पीडित महिलांनी तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली.
८ पीडितांची ओळख; आकडा वाढण्याची शक्यता
आतापर्यंत ८ पीडित महिलांची ओळख पटली असून, पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने इतर महिलांशीही संपर्क साधला आहे. नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देत सोमवारी न्यायालयातून बाहेर पडताना एरंडेने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.