मातृभूमीत परतल्याची भावनिक पोस्ट; अवघ्या काही तासांत गायिकेचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 20:56 IST2019-11-14T20:52:29+5:302019-11-14T20:56:36+5:30
शहापूरजवळ गाडीला अपघात; पतीवर उपचार सुरू

मातृभूमीत परतल्याची भावनिक पोस्ट; अवघ्या काही तासांत गायिकेचा अपघाती मृत्यू
नाशिक: प्रसिद्ध गायिका गीता माळी यांच्या गाडीला शहापूरजवळ अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यांचे पती विजय माळी जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघाताच्या काही तासांपूर्वीच गीता माळी अमेरिकेतून मुंबईत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला होता. मात्र मुंबईहून नाशिककडे जात असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गीता माळी यांचा मृत्यू झाला. गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर काही फोटो पोस्ट केले. 'मायदेशी दाखल. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. बऱ्याच कालावधीनंतर घरी आल्यानंतर अतिशय आनंदी आहे,' अशी पोस्ट लिहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील फोटो शेअर केले होते.
मुंबईत दाखल झाल्यानंतर गीता माळी पती विजय माळींसोबत नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचे पती विजय अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. माळी यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत माळी यांच्या आठवणी शेअर केल्या आहे.