सणादिवशी सख्ख्या भावांना का संपवलं?; नाशिकमधील दुहेरी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, कारण समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:27 IST2025-03-21T14:26:33+5:302025-03-21T14:27:38+5:30
ज्या टोळक्याने दोघा भावांना संपवले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सणादिवशी सख्ख्या भावांना का संपवलं?; नाशिकमधील दुहेरी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, कारण समोर!
Nashik Double Murder Case : रंगपंचमीच्या सणादिवशी नाशिक शहर दुहेरी हत्या प्रकरणाने हादरले होते. दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून पूर्ववैमनस्यातून वचपा काढायचा आणि वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी जाधव बंधूंना टोळक्याने संपवले, असं पोलिस तपासात प्रथमदर्शनी समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अवघ्या सहा तासांत या दुहेरी खुनातील पाचही आरोपींना हेरून बेड्या ठोकल्या.
नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरुच आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी सिडकोमध्ये एकाचा खून झाला. त्या घटनेला पाच दिवस होत नाही तोच पुन्हा रंगपंचमीच्या उत्साहाचा शेवट थेट दुहेरी हत्याकांडाने झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. संशयित आरोपी सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश ऊर्फ सोनू उशिरे या हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. मृत्युमुखी पडलेल्या जाधव बंधूंपैकी उमेश ऊर्फ मन्ना जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते, असेही बोलले जात आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. ज्या टोळक्याने दोघा भावांना संपविले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे उपनगर पोलिसांपुढे टाकळीरोड, बोधलेनगर, आंबेडकरवाडी, जय भवानी रोड, जेलरोड या भागातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
शेजारी बनले वैरी
मुख्य संशयित आरोपी अनिल रेडेकर, सचिन रेडेकर हे मयत जाधव बंधूंच्या शेजारीच राहायला होते. दुहेरी खुनातील हल्लेखोरांमध्ये हे मुख्य संशयित हल्लेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यांच्यामध्ये जुने वाद होते. या वादातून व परिसरात कोणाचे वर्चस्व कायम ठेवायचे यावरून हा हल्ला झाला. रंगपंचमी खेळून संशयित रेडेकर हे घरी जात असताना रस्त्यात त्यांचा शाब्दिक वाद जाधव बंधूंसोबत झाला. या वादानंतर टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढविल्याचे समोर आले आहे.
खंडणी मागणीचीही घटनेला किनार
दुहेरी खुनाच्या घटनेला वर्चस्ववादासह खंडणी मागणीचीही किनार असल्याचे दिसत आहे. दोघांकडून ५० हजारांचा हप्ता मागितला जात होता. यामुळे जाधव यांच्याविरोधात तक्रार दिल्याने त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच टोळक्यापैकी सागर गरड याच्यावर अमली पदार्थविक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.