आरक्षण बदलण्याची ‘ती’ उपसूचना अखेर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:46 IST2020-07-03T23:56:13+5:302020-07-04T00:46:27+5:30
मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे.

आरक्षण बदलण्याची ‘ती’ उपसूचना अखेर मागे
नाशिक : मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे.
महापालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्यातील पाणीपुरवठ्याच्या कामांच्या अतिरिक्त देयकावरून विरोधकांनी वाद उपस्थित केला होता. आॅनलाइन महासभा असताना विरोधी पक्षातील गटनेत्यांनी महापौरांच्या दालनात जाऊन गोंधळ घातलाच शिवाय महापौरांवर टक्केवारीचे आरोप केले होते. दरम्यान, यानंतर महापौरांनीदेखील गोंधळी मंडळीवर पलटवार करीत कायम विशिष्ट नगरसेवकच सर्व विषयांवर बोलत असल्याने संशय निर्माण होत असल्याचे सांगितले होते.
एका व्यावसायिक आरक्षणास विरोध करून ते रहिवासी विभागात समाविष्ट करावे, असे त्यात नमूद केले होते. त्यामुळेच त्यांनी महासभेत गोंधळ घातला, असा आरोप होऊ लागला होता. नियमानुसार कोणत्याही उपसूचनेसाठी महासभेत मतदान घेणे बंधनकारक आहे. परंतु महापौरांनी या उपसूचनेबाबत मतदान घेतले नव्हते, त्यामुळे ती मागे घेण्यात येत असल्याचे बग्गा आणि शेलार यांनी आता कळविले आहे.