“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:35 IST2025-09-15T17:30:13+5:302025-09-15T17:35:24+5:30
Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
Sharad Pawar on Farmer Issues: देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे तुम्ही देशाला दाखवले. मात्र, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत. देवाभाऊंना माझी विनंती आहे की जरा आजूबाजूला पाहा. काय घडतेय? आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शरद पवार यांनी संबोधित केले. देवाभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला, ते शेती करू शकले. आज शिवाजी महाराज यांचे नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमध्ये काय घडत आहे, ते पाहा. तेथील राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी आली आणि तिच्या हातात तेथील सत्ता देण्यात आली. आणखी काही मी बोलणार नाही, असा सूचक इशाराही शरद पवार यांनी दिला.
शेतकरी संकटात असताना मार्ग काढायची जबाबदारी सरकार घेत नाही
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव का देतो? शेतकरी एवढी टोकाची भूमिका का घेतो? याचं कारण शेतकऱ्यांच्या संटकाच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही, या शब्दांत शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. ही सुरूवात येथेच थांबणार नाही. महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेकरऱ्यांवर झाला आहे. संकट येत असतात. त्यावर मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते. मात्र, आपण आज पाहतो की शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
...तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे
आज नाशिकचा कांदा जगात जातो. शेतकऱ्यांना इच्छा असते की, कांदा विकल्यानंतर दोन पैसे मिळतील. ज्यामुळे मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करता येईल. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या सरकारला शेतकऱ्यांच दुख समजत नाही. आज कांद्याला दर नाही. कांदा निर्यात करा, त्यामुळे दर वाढतील. मात्र, केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? यावर उत्तर शोधायचे असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.