बाजार समितीचे कार्यालय सील

By Admin | Updated: October 27, 2016 00:26 IST2016-10-27T00:24:40+5:302016-10-27T00:26:59+5:30

एसीबी : कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

Seal the market committee's office | बाजार समितीचे कार्यालय सील

बाजार समितीचे कार्यालय सील

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम बँक मॅनेजरशी संगनमत करून परस्पर काढून जवळ बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात समितीच्या तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, चारचाकी जप्त केली आहे़ दरम्यान, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय सील करण्यात आले असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़  नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़ २५) सायंकाळी साडेसहा वाजता पेठरोडवर स्विफ्ट डिझायर (एमएच १५ सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली होती.
या प्रकरणी बाजार समितीचे कर्मचारी तथा एका संचालकांचा सचिव संशयित विजय सीताराम निकम (४२, रा़ दादोजी कोंडदेव नगर, गंगापूररोड), लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन (४७, कौशल्या निवास, पंचवटी) व लिपिक दिगंबर हिरामण चिखले (४२, रा़ जेलरोड, नाशिकरोड)  या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोकड व स्विफ्ट कार जप्त केली आहे़ यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ बाजार समितीचे प्रमुख्य कार्यालय सील करून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.   दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या तिघाही संशयितांची चौकशी सुरू केली असून, त्यात कर्मचाऱ्यांनी ही रोकड महागाई भत्ता व फरकाची असल्याचे सांगितले, मात्र ती कोठे नेत होते व कब्जात कशी आली याबाबत माहिती दिली नसल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांना वाटप केली जाणारी लाखो रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या ताब्यात कशी तसेच बॅँकेतून परस्पर रक्कम कशी काढली, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. (वार्ताहर)
संशयाची सुई बाजार समिती संचालकांवर?
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारी लाखो रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांकडे संशयास्पदरीत्या मिळाल्याने बाजार समितीत उलटसुलट चर्चा आहे. कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली ही रक्कम ही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बड्या संचालकाच्या सांगण्यावरूनच काढण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्या बड्या संचालकावर संशयाची सुई असल्याने या प्रकरणात संचालकांची उचलबांगडी होऊन चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.


 

Web Title: Seal the market committee's office