बंदूकीतून सुटलेल्या छ-र्याने शाळकरी नेमबाज जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:40 IST2019-06-06T21:39:31+5:302019-06-06T21:40:04+5:30
नाशिक : एअर गन शुटींगचा सराव करताना अचानकपणे बंदूकीतून सुटलेली गोळी (छर्रा) टार्गेटवरून पुन्हा माघारी येऊन युवा नेमबाज प्रसाद ...

बंदूकीतून सुटलेल्या छ-र्याने शाळकरी नेमबाज जखमी
नाशिक : एअर गन शुटींगचा सराव करताना अचानकपणे बंदूकीतून सुटलेली गोळी (छर्रा) टार्गेटवरून पुन्हा माघारी येऊन युवा नेमबाज प्रसाद देवीदास बैरागीच्या (१४,रा.निफाड) छातीला लागल्याने तो जखमी झाला; मात्र तत्काळ जिल्हा रूग्णालयात त्यास दाखल करण्यात आल्याने सुदैवाने अनर्थ टळला असून जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नेवासा येथील सैनिकी शाळेत प्रसाद शिकत असून त्याने आठवीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. मागील वर्षभरापासून तो एअर गन शुटींग स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याने जिल्हा, विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकही पटकाविले आहे. नुकत्याच राज्य असोसिएशनच्या मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याचे समजते. उन्हाळी सुटी असल्यामुळे प्रसाद मुळ गावी निफाडला घरी आला आहे. गुरूवारी (दि.६) सायंकाळी नेहमीप्रमाणे तो शुटींगचा सराव करत होता. यावेळी बंदूकीतून सुटलेली छर्रा समोरील अडथळ्यावर आदळून पुन्हा माघारी फिरल्याने प्रसादच्या छातीला येऊन लागली. अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायधनी यांनी प्रसादवर तत्काळ उपचार सुरु केले. प्रसादची प्रकृती स्थिर असून जास्त गंभीर प्रकार नसल्याचे सैंदाणे म्हणाले.