नाशिक महापलिकेच्या सर्व शाळांमध्ये लवकरच अक्षयपात्र योजना राबविणार: सरीता सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:25 IST2019-01-03T16:14:23+5:302019-01-03T16:25:25+5:30
नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण समितीच्या नवनिर्वाचीत सभापती प्रा. सरीता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे

नाशिक महापलिकेच्या सर्व शाळांमध्ये लवकरच अक्षयपात्र योजना राबविणार: सरीता सोनवणे
नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण समितीच्या नवनिर्वाचीत सभापती प्रा. सरीता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यातच त्यांची सभापती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी सुत्रे घेतल्यानंतर विविध योजना राबविण्याचा मनोदय केले. याशिवाय महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्राथमिक सुविधा देतानाच शाळा डिजीटल करण्यावर भर देण्यात येणार आहे.
प्रश्न: मनपा शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षात कोणती खास योजना राबविणार आहात?
प्रा. सोनवणे: मला शिक्षण क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये येणारा वर्ग तळागाळातील असतो. शासनाने पटसंख्या वाढविण्यासाठी पोषण आहार योजना दिली असून ती चांगली आहे. त्यामुळे अक्षयपात्र योजना राबविण्याचा मानस आहे. त्यात बचत गटांना सामावून घेता येईल का याचा विचार करणार आहे. त्याच प्रमाणे महापालिकेच्या सर्व शाळांना भेटी देणार असून त्यासंदर्भात सुरूवात देखील झाली आहे. ज्या शाळांना कंपाऊंड नाही तसेच अन्य सुविधा नाहीत, त्यांना त्या प्राधान्याने देण्यात येणार आहे.
प्रश्न: शाळांसाठी कोणत्या नव्या योजना आहेत?
प्रा. सोनवणे: मला सभापती म्हणून फार कमी कालावधी मिळाला आहे परंतु तरीही मी त्यात अनेक नविन योजना राबविणार आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सर्व शाळा डिजीटल करण्याचा मानस आहे. त्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे. शाळांमधील शिकवणे तसे उपस्थिती यासंदर्भातील सर्व माहिती शिक्षण विभागात मिळू शकेल. त्यामुळे मुलांच्या अध्यापनाकडे लक्ष देता येईल. याशिवाय खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी सेमी इंग्रजीचे अधिकाधिक वर्ग सुरू भर देण्यात येणार आहे.
प्रश्न: मुलांच्या विकासासाठी काही योजना आहेत काय?
प्रा. सोनवणे: गरीब मुलांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याचा विचार आहे. त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देताना केवळ मागसवर्गीयांनाच ते देण्याची तरतूद आहे परंतु अशाप्रकारे भेदाभेद न करताच सर्व मुलांना गणवेश देण्यात येतील. मुलांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी अटल वक्तृत्व स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येईल. तसेच क्रीडा महोत्सव देखील सुरू करण्यात येणार आहे.
मुलाखत- संजय पाठक