संत कबीरनगरात मूलभूत सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST2019-05-10T23:41:43+5:302019-05-11T00:04:31+5:30
गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भरण्यास तयार असतानाही मनपाकडून घरपट्टी आकारण्यास टाळाटाळ केली जात आहे.

संत कबीरनगरात मूलभूत सुविधांची वानवा
समस्यांचा फेरा
कबीरनगर वसाहत
गंगापूर : गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भरण्यास तयार असतानाही मनपाकडून घरपट्टी आकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. घरपट्टी लागू झाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्या लागतील म्हणूनच महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
संत कबीरनगरातील लोक सातपूरच्या औद्योगिक कारखान्यांमध्ये तसेच गंगापूररोडवर व्यवसाय करून उपजीविका भागवितात. महापालिका क्षेत्रात या वसाहतीचा समावेश असला तरी, सुविधा पुरविण्यात नेहमीच दुर्लक्ष केले जाते. या भागात घंटागाडी वेळेवर येत नाही, रस्ते अरुंद असल्याचे कारण देऊन महापालिका प्रशासनाने घंटागाडी बंद करून टाकली. त्यामुळे येथील नागरिक आपला कचरा नाशिक उजवा कालव्यात टाकतात. त्यामुळे परिसरात डास वाढल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, थंडी-ताप, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका संभवतो. संत कबीरनगर वसाहतीत पाणी कमी दाबाने आणि गढूळ येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. हा भाग प्रभाग क्रमांक ८ मध्ये येतो. या भागात घंटागाडी बंद झाल्याने नागरिकांनी कचरा टाकायचा तरी कुठे असा प्रश्न संजू गव्हाणे यांनी केला आहे. अरुंद गल्ली व रस्ते असल्याने मोठी घंटागाडी वसाहतींमध्ये येत नव्हती; मात्र महापालिकेने नंतर छोटी घंटागाडी सुरू केली होती. नंतर ती बंद झाल्याने तो रस्त्याच्याकडेला अथवा पाटात टाकावा लागतो अशी तक्रार नंदू खोबे यांनी केली आहे.
या भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी धूर फवारणी करावी मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भीमराव दोंदे यांनी सांगितले. या वसाहतीत साधारण ३०० च्या वर झोपड्या आहेत घरपट्टी लागू करावी अशी मागणी वामन बेंडकुळे यांनी केली.
लहान मुले चौकात खेळतात, त्यांच्या दृष्टिकोनातून परिसरात साफ सफाई झाली पाहिजे, रोजच्या रोज कचरा उचलला गेल्यास आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाही. गटारींची साफ सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. - शशिकला साळवे, रहिवासी