पाण्याअभावी कांदापात काढली विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:17 IST2019-02-07T18:17:11+5:302019-02-07T18:17:15+5:30
देशमाने परिसर : भाव घसरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका

पाण्याअभावी कांदापात काढली विक्रीला
देशमाने : येवला तालुक्यात झालेला अत्यल्प पावसाने विहिरींनीही तळ गाठला कांद्याची उभी पिके कांदापात म्हणून विकण्याची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. नगदी पीक म्हणून परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र कांद्याने शेतक-यांचे सर्व अंदाज फोल ठरवत डोळ्यात पाणी आणले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल, असा अंदाज शेतक-यांचा होता. परिणामी रब्बी हंगामातील गहू, हरबरा आदी पिके न घेता कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा लागवडीवर अन्य पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च देखील वाढला. मात्र सगळे चित्र उलटे झाले. गत वर्षाचा उन्हाळ कांदा घसरलेल्या बाजारभावामुळे तब्बल ८ ते ९ महिने चाळीत पडून राहिला. जास्त कालावधीमध्ये सदर कांदा चाळीतच सडला तर अनेक शेतक-यांनी तो मातीमोल भावात विकला. पाठोपाठ लाल कांद्याचीही तीच गत झाली. आता तर काढणीस आलेल्या कांद्यास मजूर मिळणे देखील कठीण झाल्याने शेतकºयांवर उभ्या पिकांत जनावरे सोडून देण्याची वेळ आली आहे. कांदा पिकामुळे परिसरात गव्हाचे क्षेत्र निम्म्याहून अधिक घटले. एकीकडे गव्हाचे बाजारभाव वाढत आहेत तर कांदा पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही. दुसरीकडे झालेला खर्चही निघेना व कांदा पिकामुळे फायदेशीर ठरणारे गव्हाचे पीकही बुडाल्याने शेतकºयांचे दुहेरी नुकसान होत आहे.