बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:28 PM2021-06-27T19:28:46+5:302021-06-27T19:31:18+5:30

ड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त; ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना

A reality show actress with a Bollywood choreographer rave party Police raid two bungalows in Igatpuri nashik | बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

Next
ठळक मुद्देड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त.ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना

नाशिक : बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्री यांना इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टी करणे चांगलेच भोवले. पोलिसांच्या धाडीत येथील बंगल्यातून १० पुरुष आणि १२ महिला मिळून एकूण २२ व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांना सापडले.

नाशिकमधीलइगतपुरीचा परिसर नेहमीच पर्यटकांपासून बॉलिवुडच्या कलाकारांना भुरळ घालणारा ठरला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अनेकांना खुणावते. याचाच गैरफायदा घेत अंमली पदार्थांची नशा करण्याकरिता मुंबई येथून हायप्रोफाईल सिनेतारकांचाही राबता या भागात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. येथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा समुहाची पार्टी होत असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या सर्वांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान, याप्रकरणी विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी महिलाही जाळ्यात
१०पुरुष, १२ महिलांसह एकुण २२उच्चभ्रू व्यक्तींचा मोठा समुह इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यामध्ये काही महिला थेट बॉलिवुडशी संबंधित असून एक विदेशी महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला इराणची नागरिक असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचा पुरवठा मुंबईतून?
रेव्ह पार्टी करण्यासाठी इगतपुरीत दाखल झालेला २२लोकांचा हायप्रोफाईल समुहाने आपल्यासोबत अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याबाबतचा तपास करण्याकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तातडीने मुंबईत रवाना करण्यात आले आहे.


गोपनीय माहितीवरुन शनिवारी मध्यरात्री आम्ही छापा टाकला. या कारवाईत एकूण २२ लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन कोरियोग्राफर, एक रिॲलिटी शोमधील अभिनेत्री आणि एक विदेशी महिलेचा समावेश आहे. कोकेनसारखे अंमली पदार्थांचे सेवन या सर्वांकडून केले जात होते. अंमली पदार्थाचा पुरवठा कोणी व कोठून केला? यांच्यासोबत अजून काही साथीदार होते का? आदी बाबींचा तपास केला जात आहे. एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.
सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

Web Title: A reality show actress with a Bollywood choreographer rave party Police raid two bungalows in Igatpuri nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.