रेशन दुकानदार आजपासून संपावर

By Admin | Updated: December 31, 2016 23:53 IST2016-12-31T23:53:38+5:302016-12-31T23:53:59+5:30

आज बैठक : घासलेट विक्रेत्यांचा पाठिंबा

Ration shopkeepers strike from today | रेशन दुकानदार आजपासून संपावर

रेशन दुकानदार आजपासून संपावर

नाशिक : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुकानासाठी धान्य न उचलण्याचा निर्णय रेशन दुकानदार महासंघाने घेतला असून, त्यांच्या या संपाला घासलेट विक्रेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी दुपारी रेशन दुकानदार संघटनेची बैठक बोलविण्यात आली आहे.
शासकीय धान्य गुदामातून थेट रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याची शासनाची जबाबदारी असताना ती पाळली जात नाही, उलट हमालांकडून जबरदस्तीने पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे हमालीमुक्त धान्य मिळावे, कमी केलेला घासलेटचा कोटा पूर्ववत करावा, आधारकार्ड क्रमांक गोळा करण्याचे काम शासकीय यंत्रणेने करावे आदि मागण्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्यामुळे राज्य फेडरेशनने बेमुदत धान्य व केरोसिन कोटा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांच्या या मागण्यांना घासलेट विक्रेत्यांनी पाठिंबा दर्शवून १ जानेवारी पासून घासलेट न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता कालिका सभागृह येथे बैठक बोलविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ration shopkeepers strike from today