लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बेडर रामोशी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी समाज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने मागण्या मान्य न केल्यास मंगळवारी विधानभवनावर धडक देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.कृती समितीचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता गोल्फ क्लब मैदानावरून बेरड, बेडर रामोशी समाजाचा मोर्चा काढण्यात आला. त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालिमार चौक, एम.जी.रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडविण्यात आला.
यावेळी मोर्चेकºयांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची ७ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जयंती साजरी केली जावी, शासकीय कार्यालयात त्यांची छायाचित्रे लावण्यात यावी, पुरंदर तालुक्यातील भिवडी या नाईक यांच्या जन्मगावी त्यांचे राष्टÑीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी, रामोशी समाजाच्या धनदांडग्यांनी बळकावलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या इनामी वतने जमिनी समाजाला परत कराव्यात, रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी क्रांतिवीर नाईक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, बेरड, रामोशी व तत्सम जमातींचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.