दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

By Admin | Updated: July 3, 2016 22:34 IST2016-07-03T22:30:41+5:302016-07-03T22:34:01+5:30

पाऊस @ 14.8 मिमी

Rainfall of rain in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

दिंडोरी : दिंडोरी शहरासह तालुक्यात शनिवार सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू असून, पावसाच्या आगमनाने शेतकरी, नागरिक हर्षोल्हासित झाले असून, दिंडोरी तालुक्यात टमट्यासह भाजीपाला लागवडीची लगबग सुरू झाली आहे.
यंदाच्या भीषण दुष्काळामुळे दिंडोरी तालुक्यातील बागायती शेती अडचणीत आली होती, तर अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत होते. त्यातच चार धरणे कोरडीठाक झाल्याने अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. जून संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तोंडचे पुरते पाणी पळाले होते. अखेर उशिरा का होईना गत आठवड्यात एक दिवस काही भागात पावसाच्या दमदार हजेरीने दिलासा मिळाला होता, मात्र काही गावे कोरडी होती.
अखेर शनिवारी दुपारनंतर मोसमी पावसाची रिपरिप सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून कमी अधिक प्रमाणात कोसळत होत्या. पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक होते, तर तुलनेने पूर्व भागात कमी पाऊस झाला. (लोकमत चमू)

Web Title: Rainfall of rain in Dindori taluka