कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

By Admin | Updated: August 3, 2014 02:04 IST2014-08-03T02:03:46+5:302014-08-03T02:04:09+5:30

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

Rainfall in Kalwan taluka | कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

 

कळवण : तालुक्यात गेल्या आठ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाडे- वस्त्यांचा संपर्क तुटला असून, परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनिल पुरे यांनी दिली. दरम्यान, शिंगाशीला अनोळखी युवकाचे शव आढळून आले आहे.
सप्तशृंग गडावर झालेल्या मुसळधार पावसाने बेहडी नदीला आलेल्या पूर पाण्यामुळे मानूर गावाजवळ कोल्हापूर फाट्यानजीक बंधाऱ्याचा भराव खचल्याने शशिकांत अहेर यांच्या मक्याच्या शेतीमध्ये पाणी घुसले. यात मक्याचे चार एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच मानूर येथेच बेहडी नदीकाठावरील मनोहर पवार यांच्या शेतात पाणी घुसल्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतात खड्डे निर्माण
झाले असून, पिकांचे नुकसान झाले आहे.
या ठिकाणी तलाठी एम. एस. कापडणीस यांनी पंचनामा केला आहे. शहरात असलेल्या भवानी कॉम्प्लेक्स बिल्ंिडगची संरक्षक भिंत पावसामुळे पडली असून, या ठिकाणी असलेल्या वीजरोहित्राची माती खचल्यामुळे तिरपी झाली आहे. तालुक्यातील जांभाळ व महाल भागातील रस्ते उखडून गेले आहे. कळवण ते सुरगाणा तालुक्यांचा संपर्क तुटला असून, मांगलीदर, वीरशेत, राठीआंबा, जिरवाडे, धनोली, शृंगारवाडी आदि १२ ते १३ खेड्यांवरील २५० आदिवासी विद्यार्थी दळवट गावापर्यंत पायपीट करून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दळवट ते शृंगारवाडीपर्यंत असलेल्या नदीनाल्यावरील पुलाची बांधकामे पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. यंत्रणा या भागापर्यंत पोहोचली नसल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.
भाताची लागवड बंद
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम भागातील भात लागवडीचे काम ठप्प झाले आहे. भाताची रोपे तयार झाली असून, पावसाने उघडीप न दिल्याने यावर्षी भात लागवड सुरुवात झाली नसल्याचे तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी सांगितले.
पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. शिंगाशी येथे तांबडी नदीपात्रात एक युवकाचे शव आढळून आले. त्याची ओळख पटली नसून अभोणा पोलिसांत अज्ञात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Rainfall in Kalwan taluka