सरींचा वर्षाव अन् वातावरणात गारठा; आर्द्रतेचे प्रमाण थेट ९२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 19:09 IST2020-12-13T19:04:40+5:302020-12-13T19:09:37+5:30
वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

सरींचा वर्षाव अन् वातावरणात गारठा; आर्द्रतेचे प्रमाण थेट ९२ टक्के
नाशिक : लहरी निसर्गामुळे वातावरण बदलाचा कमालीचा अनुभव नाशिककरांना मागील चार दिवसांपासून येत आहे. शनिवारी संध्याकाळी रिमझिम सरींचा बेमोसमी वर्षाव झाला. रविवारी (दि. १३) पुन्हा सकाळ-संध्याकाळ मध्यम सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिल्याने नाशिककरांना रविवारीसुद्धा सूर्यदर्शन घडले नाही. या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानाचा पारा १७ अंशावर असला तरी कमाल तापमानाचा पारा वेगाने घसरत असून वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. आर्द्रतेचे प्रमाण रविवारी सकाळी ९२ टक्के इतके नोंदविले गेले.
अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे चक्रवात क्षेत्राची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.दक्षिण पूर्व-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. मागील चार दिवसांपासून शहराच्या हवामानात मोठा बदल नाशिककरांना अनुभवायला येत अहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास दृश्यमानतादेखील कमी झाली होती. मध्यम सरींचा रिमझिम वर्षाव, दाटलेले धुके आणि सुटलेला थंड वारा असे काहीसे वातावरण अनुभवायला आले. यामुळे रविवारची सुटी असूनही शहरामधील जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून आली नाही. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.