Prepared for Disaster Management? | आपत्ती व्यवस्थापनाची तयारी झाली?

आपत्ती व्यवस्थापनाची तयारी झाली?

ठळक मुद्देगोदावरीतील अतिक्रमणे जैसे थेगावठाणातील वाड्यांवर निर्णय नाहीआपत्ती व्यवस्थापनासमोरच आपत्ती

संजय पाठक. नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी गटारी तुंबल्या की, लोकांनी प्लास्टीकच्या कॅरीबॅगा फेकल्यानेच ही समस्या उदभवल्याचा ठपका देखील ठेवला जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वाडे आणि काजी गढीचा प्रश्न हा सोडविला गेला ना सुटेल. परंतु दुर्घटना घडली की दोष मात्र वाडेकऱ्यांनाच दिला जाईल.

खरे तर पावसाळा ही यंत्रणेसाठी इष्टापत्तीच असते. मुंबईत नाले सफाईत घोटाळे होतात तसे येथेही उघड होतात. परंतु त्याचे पुरावे नसतात. नाशिक महापालिकेने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पावसाळी गटार योजना साकारली. सुमारे तीनशे कोटी रूपयांच्या योजनेने काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी गटार योजना ज्या भागात केली आहे. तेथेही पाणी साचते. मग, पावसाळी गटारीचा महाघोटाळा टाळण्यासाठी पावसाला म्हणजे निसर्र्गालाच दोषी धरले जाईल.

आता महापालिकेने पावसाळा पूर्व कामांची लगबग सुरू केली आहे. नाले सफाई सुरू आहे. गावठाण भागातील मोडकळीस आलेल्या वाड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु अशा सर्व तयारी मुळे सर्वच ठिकठाक होईल असे नाही याचे मुळ कारण अनेक बाबतीत स्थायी तोडगा काढणे शक्य असून तो कधीही काढला जात नाही. गेल्या वर्षी तांबटलेनमधील काळे वाडा पडून दोन जण ठार झाले होते. त्यानंतर गावठाण भागात क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय चर्चिला गेला. राजकिय नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात कलस्टर मंजुर झालेच नाही. असे अनेकबाबतीत घडते. काजीची गढी हा सर्वाधिक धोकादायक भाग. तो खासगी जागेवर असल्याने त्याचा तिढा सुटलेला नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा नदीपात्राचा असून नदीपात्रातील अतिक्रमीत बांधकामे त्यातील अवरोध होईल असे अडथळे जैसे थे आहे. त्यामुळे सराफ बाजार आणि अन्यत्र पाणी शिरणारच!


मग हे सर्व होणार असेल तर पावसाळा पूर्व कामांची सज्जता झाली असे म्हणता तरी कसे येईल. एकुणातच आव्हानासाठी सज्जता म्हणायला ठीक आहे. परंतु सर्वच जैसे थे असेल तर आपत्ती कशी टळणार?


 

 

 

Web Title: Prepared for Disaster Management?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.