गोरखपूर एक्सप्रेसमध्ये गर्भवतीस प्रसुती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:10 IST2020-02-29T17:10:05+5:302020-02-29T17:10:23+5:30
मदतीचा हात : रेल्वे कर्मचाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन

गोरखपूर एक्सप्रेसमध्ये गर्भवतीस प्रसुती कळा
लासलगाव : मुंबई-गोरखपूर एक्सप्रेसने प्रवास करणा-या एका गर्भवती महिलेला गाडीतच प्रसुती कळा सुरू झाल्याने ती बेशुद्ध पडली. लासलगाव रेल्वे स्थानकावर गाडी येताच स्थानिक रेल्वे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या मदतीने माणुसकीचे दर्शन घडवत तत्काळ या महिलेला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करत तिचे प्राण वाचविले.
सातकुंड (ता. कन्नड, जिल्हा औरंगाबाद) येथील भाग्यश्री लहू गायकवाड ही गर्भवती महिला आपली आई व भाऊ व इतर नातेवाइकांसह कल्याण येथून चाळीसगाव येथे जाण्यासाठी मुंबई गोरखपूर एक्सप्रेस ने प्रवास करत होती. मात्र प्रवासातच तिला प्रसुती कळा सुरू होऊन ती बेशुद्ध पडली होती. याबाबतची खबर तातडीने लासलगाव रेल्वे स्थानकावर कळविण्यात आली आणि गाडी स्थानकावर येताच स्टेशन अधिक्षक एस. व्ही. सुरवाडे यांचेसह कर्मचारी, रेल्वे पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते निदीन शर्मा यांनी मदतीसाठी धाव घेतली. या महिलेला प्राथमिक उपचार करत प्रतिक्षालयात ठेवण्यात आले. त्यानंतर रु ग्णवाहिकेतून या महिलेला ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ राजाराम शेंन्द्रे व कर्मचारी यांनी उपचार करत दुपारी अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. सदर महिलेला वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले.