Power supply of ten villages is divided | दहा गावांचा वीजपुरवठा खंडित
दहा गावांचा वीजपुरवठा खंडित

देवळाली कॅम्प : भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी मध्यरात्री तुटल्याने सिन्नर तालुक्यातील ९ ते १० गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला.
भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील पडीक जागेतून सिन्नर तालुक्यातील पांढुर्लीच्या दिशेने गेलेली ४० वर्षांपूर्वीची ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास तुटल्याने पांढुर्ली, भोरवड, शिवडा, सावता माळीनगर, विंचूर दळवी, वडगाव, बेलू, आगासखिंड आदी गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
पांढुर्ली येथे शेतातून जाणारी ११ केव्हीची विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. सदर विद्युत वाहिनी ही ४० वर्षांपूर्वीची असल्याने धोकादायक स्थितीत आहे. मात्र महावितरणकडून विद्युत वाहिनी स्थलांतरित केली जात नसल्याने दुर्घटना घडण्याची महावितरण वाट बघत आहे का असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.
नागरिक उकाड्याने हैराण
उन्हाळ्याच्या दिवसात उकाड्याने सर्वजण हैराण झालेले असताना ११ केव्हीची वायर तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने मंगळवारी रात्रीपासूनच ९ ते १० गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विद्युत वाहिनी तुटल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी व दुर्घटना घडली नाही. महावितरणकडून बुधवारी सकाळपासून तुटलेली विद्युत वाहिनी दुरुस्तीचे काम दुपारी पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.


Web Title: Power supply of ten villages is divided
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.