Political innings and EVM disturbances, Chhagan Bhujbal's suspicion of election commission | EVM मध्ये गडबड अन् राजकीय डावपेच, छगन भुजबळांना दाट संशय
EVM मध्ये गडबड अन् राजकीय डावपेच, छगन भुजबळांना दाट संशय

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला आहे. नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. ईव्हीएम मशिन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी राजकीय डावपेच असल्याचे सांगत भुजबळ यांनी काहीतरी गडबड असल्याचा मला संशय वाटतो, असे म्हटले आहे. 

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे. या अधिकाऱ्यांवर वरुन काहीतरी दबाव आणलेला असू शकतो, असे म्हणत समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळांसह समीर आणि पंकज भुजबळ या भुजबळ कुटुंबीयांनी सपत्नीक मतदान केलं आहे. मतदार केल्यानंतर भुजबळांनी मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय, असे भुजबळ म्हणाले. हिराबाई मगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्या आईचं नाव असून, मतदार यादीतून समीर भुजबळांच्या आईचे नाव गायब असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

मशिन बंद पडत आहेत किंवा लोकांना योग्य मार्गदर्शन होत नाही. जी मतदान केंद्रे तयार केली आहेत, त्यावर योग्य सूचना नसल्यामुळे लोकं इकडून तिकडे धावत आहेत. एकूणच उन्हात मतदान कमी होते ते यामुळेच. कदाचित यामागे काहीतरी राजकीय डावपेच असल्याचे सांगता येणं कठीण नाही, असे म्हणत भुजबळ यांनी संशय व्यक्त केला. तर, नक्कीच काहीतरी गडबड आहे, असा संशय असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. 
 

Web Title: Political innings and EVM disturbances, Chhagan Bhujbal's suspicion of election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.