बदलीसाठी पोलिस निरीक्षकांकडे मागितले ३० लाख, पोलिसाला खंडणीखोर हवालदाराचा मित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 20:33 IST2025-07-30T20:32:08+5:302025-07-30T20:33:15+5:30
पोलिस निरीक्षकांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात बदली करून देतो, असे सांगून ३५ लाखांची खंडणीची मागणी करत तीस लाख उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिस दलातील हवालदार संशयित नितीन सपकाळे व त्याचा मित्र सागर पांगरे-पाटील यांनी केला.

बदलीसाठी पोलिस निरीक्षकांकडे मागितले ३० लाख, पोलिसाला खंडणीखोर हवालदाराचा मित्र
नाशिक : मालेगाव शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अंमलदाराला स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) बदली करून देतो, असे सांगून त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी उकळली; तसेच भद्रकाली पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात बदली करून देतो, असे सांगून ३५ लाखांची खंडणीची मागणी करत तीस लाख उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिस दलातील हवालदार संशयित नितीन सपकाळे व त्याचा मित्र सागर पांगरे-पाटील यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पांगरे-पाटील यास दोन लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ग्रामीण पोलिस दलातील मालेगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले फिर्यादी पोलिस अंमलदार गौतम भिकन बोराळे (३७) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सागर पांगरे-पाटील याच्यासोबत त्यांची ओळख झाली.
या ओळखीतून बोराळे यांनी त्यांचा सहकारी हवालदार संशयित सपकाळे याची पांगरे-पाटीलसोबत ओळख करून दिली. बोराळे यांना स्थानिक गुन्हे शाखेत बदली करून देतो, यासाठी शहरातील चांडक सर्कल या ठिकाणी बोलावून घेतले.
यानंतर बोराळे व त्याच्या मित्रांनी पांगरे-पाटील यास ऑनलाइन एकूण दोन लाख रुपये पाठविले. त्यानंतर १५ जुलै ते २५ जुलै या असा कालावधी लोटला तरीदेखील बदलीच्या कुठल्याही हालचाली झाल्या नाही. यामुळे त्यांनी पांगरे-पाटील याच्याकडे पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अजून एक लाख रुपयांची मागणी करीत अन्यत्र बदली करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात मुंबई नाका पोलिसांनी पांगरे पाटील यास दोन लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे.
'...तर कोठेही चांगल्या ठिकाणी बदली होऊ देणार नाही'
नाशिकरोड पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले फिर्यादी प्रशांत नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पांगरे पाटील व त्याचा ग्रामीण पोलिस दलातील मित्र सपकाळे यांनी संगनमताने पोलिस निरीक्षकांची इंदिरानगर येथे बदली करून देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपये सुरुवातीला शुक्रवारी (दि.२५) सकाळी साडेदहा वाजता चांडक सर्कल येथे मागितले.
प्रत्यक्षात पोलिस अधिकारी, अंमलदार यांची दोघा संशयितांसोबत भेट झाली. 'शंभर टक्के बदली करून देतो, ३५ लाख जमवण्याची तयारी करा, हे पैसे मी सागर पांगरे-पाटील यांना देणार आहे,' असे सपकाळे याने सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच 'पैसे न दिल्यास पांगरे पाटील यांची वरपर्यंत खूप ओळख असून, ते कोठेही चांगल्या ठिकाणी बदली होऊ देणार नाही,' असा दमदेखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.